नळवाडी शिवारात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 02:23 PM2020-06-18T14:23:44+5:302020-06-18T14:24:14+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात उसाच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना बुधवारी (दि.१७) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात उसाच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना बुधवारी (दि.१७) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. कासारवाडी-डोंगरगाव रस्त्यालगत नळवाडी शिवारात शांताराम नाईकवाडी यांची गट नंबर ३०५ मध्ये शेतजमीन व वस्ती आहे. चार दिवसांपूर्वी बिबट्याने नाईकवाडी यांची शेळी फस्त केली होती. रात्री अपरात्री या भागात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. बिबट्याचा वावर वाढल्याने या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी पी. बी. सोनवणे, वनपरिमंडळ अधिकारी पी. ए. सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर सोमवारी दुपारी नाईकवाडी यांच्या ऊसाच्या शेतात वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंज-यात सावज ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजºयात अलगद अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. जेरबंद बिबट्या हा शरीराने सदृढ असून अंदाजे पाच ते साडेपाच वर्षाचा आहे. सिन्नर येथील वन उद्यानात त्याची रवानगी केली असून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी केली असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी सरोदे यांनी दिली.