जिल्हा परिषदेच्या ३०२ शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:06+5:302021-05-11T04:16:06+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील ३०२ शाळांची पटसंख्या ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील ३०२ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा एकूण ३०२ अशा शाळा बंद तर होणार नाही ना, अशी भीती शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील या शाळा अतिदुर्गम आणि परिसरात अन्य शाळा नसलेल्या भागात असल्याने यातील बहुतांश शाळा सुरूच राहणार असून, शिक्षण विभागाने अद्याप कोणत्याही शाळेचे समायोजन केलेले नसल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत्या कलामुळे झेडपीच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. त्यातच कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणपद्धती सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या तुलनेत खासगी शाळा याबाबतीत पुढे आहेत. त्यामुळे एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा व त्यांची पटसंख्याही वाढत असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेत कुठे १०, तर २० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येबाबत अहवाल मागितला होता. यात नाशिक जिल्ह्यातील ३०२ शाळांमध्ये २०पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे समोर आले आहे. अशा शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नव्या सत्रात या शाळांचे समायोजन तर केले जाणार नाही ना, असा प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांना भेडसावत असताना नाशिक जिल्ह्यातील २० पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या बहुतांश शाळा अतिदुर्गम व परिसरात दुसरी शाळा नसलेल्या भागात असल्या भागात असल्याने या शाळा समायोजनाच्या निकषांना अनुसरून बंद करता येणार नाही. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाकडूनही या शाळा बंद करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.