किसान सभेचे चलो दिल्ली, २१ रोजी नाशिकमधून मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:07 PM2020-12-16T16:07:26+5:302020-12-16T16:07:44+5:30
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बळ
सुरगाणा : अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलची ऑनलाईन बैठक होऊन यात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकऱ्यांचा वाहन मोर्चा थेट दिल्लीला घेऊन जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
दिनांक २१ डिसेंबर २०२० रोजी नाशिक येथून या भव्य शेतकरी मोर्चाला सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. नाशिक, ठाणे - पालघर व अहमदनगर जिल्ह्यातून मोर्चात सहभागी होणारे शेतकरी सोमवारीसच सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक येथे पोहचतील. महाराष्ट्र मधील अन्य जिल्ह्यातून मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी रविवारी ( दि. २०) रात्री मुक्कामी नाशिक येथे पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले.
दिल्ली मोर्चात सहभागी होण्यासाठी तसेच आठ ते दहा दिवस सर्वांना दिल्लीच्या सीमेवर रहावे लागणार असल्याने वाहने, डिझेल, भरपूर गरम कपडे, भोजन, पाणी, सॅनिटायजर, त्यासाठी लागणारे पैसे यासह संपूर्ण तयारी संबंधित जिल्ह्यांनी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या या संघर्षात संपूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचे
डॉ.अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.