नाशिक : गेल्या रविवारपासून बिघडलेले शहराचे सामाजिक स्वास्थ्य आणि निर्माण झालेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या पार्श्वभूमीवर शहरातील स्वातंत्र्य सैनिक, सर्व लोकप्रतिनिधी व सर्व समाजाचे नेते, धार्मिक नेत्यांनी एकत्र येत शहराची सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध असल्याची शपथ घेतली.बिघडलेली कायदा सुव्यवस्था आणि धोक्यात आलेली सामाजिक शांतता आणि त्यामुळे जनसामान्यांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना हे वातावरण नाहीसे व्हावे, यासाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नेत्यांची एकत्रित बैठक हुतात्मा स्मारकात झाली. यावेळी स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर यांनी ‘चला शांतता अबाधित ठेवूया... नाशिकची प्रतीभा उंचावू या...’ हे आवाहनपत्रकाचे वाचन केले. या पत्रकावर उपस्थित सर्व नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर सर्वांनी शहराची शांतता व कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी कटिबद्ध असल्याची शपथ घेतली. राष्ट्रगीताने सामूहिकरीत्या गायन करून बैठकीची सांगता करण्यात आली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, स्वातंत्र्यसैनिक पंडित येलमामे, आमदार बाळासाहेब सानप, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी महापौर अशोक दिवे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, शांताराम चव्हाण, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, मौलाना महेबुब आलम, परवेज पिरजादा, जयप्रकाश जातेगावकर, सुरेश पाटील, लक्ष्मण सावजी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कोणी अफवा पसरवू नका, जर कोणी अफवा फैलावत असल्याचे आढळून आल्यास त्यांना रोखा व पोलिसांना सहकार्य करा, असा सूर यावेळी उमटला. सूत्रसंचालन डॉ. हेमलता पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)
चला शांतता ठेवूया...
By admin | Published: October 14, 2016 12:39 AM