शिवजयंती मिरवणुकीत आवाजाची पातळी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:40 AM2020-02-21T00:40:36+5:302020-02-21T00:41:03+5:30
नाशिकरोड येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी पुतळा येथे ध्वनिक्षेपकाने आवाजाची पातळी ओलांडल्याने समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री वेळेत ध्वनिक्षेपक बंद करूनही पोलीस प्रशासनाने जबरदस्तीने विद्युत दिवे बंद केल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी पुतळा येथे ध्वनिक्षेपकाने आवाजाची पातळी ओलांडल्याने समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री वेळेत ध्वनिक्षेपक बंद करूनही पोलीस प्रशासनाने जबरदस्तीने विद्युत दिवे बंद केल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिकरोड व जेलरोड येथील शिवाजी पुतळा येथे शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत व्यासपीठावर लावण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकाचा आवाज मयादेत ठेवण्याची सूचना देण्यात आलेल्या असतानाही समितीचे अध्यक्ष विशाल संगमनेरे यांनी आवाज कमी करण्यास नकार दिला. त्याचबरोबर आवाजाची तीव्रता वाढून कार्यकर्त्यांना नाचण्यास चिथावणी दिली म्हणून नाशिकरोड पोलीस ठाण्यात नगरसेवक संगमनेरे यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांनी साउंड सिस्टिमही जप्त केली. याबाबत गुरुवारी दुपारी माजी आमदार योगेश घोलप, उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल संगमनेरे व इतर पदाधिकाऱ्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर साउंड सिस्टिम व इतर साहित्य परत करण्यात आले.
शिवाजी पुतळा येथे गुरुवारी सायंकाळी सुरू असलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त विजय खरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी भेट देऊन पाहणी केली.
शिवप्रेमींमध्ये नाराजी
नाशिकरोड परिसरात शिवजन्मोत्सव समिती व विविध पक्ष, संघटना, संस्थांच्या वतीने बुधवारी शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. नाशिकरोड येथील शिवाजी पुतळा येथे विविध भागांतून येणाºया चित्ररथाचे व शिवप्रेमींचे उत्सव समितीच्या वतीने स्वागत करण्यात येत होते. रात्री १२ वाजेपूर्वीच उत्सव समितीच्या व्यासपीठावरील व चित्ररथापुढील वाद्य बंद करण्यात आले होते. त्यामुळे गर्दी पांगत असताना पोलिसांनी समितीच्या वतीने लावण्यात आलेले विद्युत दिवे जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडल्याने काही प्रमाणात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.