संशयित प्रियकराचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:32+5:302021-04-20T04:15:32+5:30
---- लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिच्या संशयित प्रियकराची पत्नीशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या कारणातून तीन वर्षांपूर्वी ...
----
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिच्या संशयित प्रियकराची पत्नीशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या कारणातून तीन वर्षांपूर्वी कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या खून खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पती दीपक भगवान पवार (३५, रा. भैरवनाथ नगर, जेल रोड) याला दोषी ठरवले असून, सोमवारी (दि. १९) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पंचक शिवारात राहणाऱ्या पवार याने २०१८ साली गंगावाडी शिवारात संदीप वसंत मरसाळे याला कुऱ्हाडीने वार करुन ठार मारले होते. संदीपचे आपल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध आहेत, असा संशय घेत मनात राग धरुन पवार याने संदीपला जीवे मारले होते तसेच त्याचा मित्र या गुन्ह्यातील फिर्यादी अक्षय माधव बालाईत यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पवारविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात खून, प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक के. एल. सोनोने यांनी या गुन्ह्याचा तपास करत पवारला बेड्या ठोकल्या होत्या. तसेच सबळ पुरावे गोळा करुन जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या न्यायालयात या खून खटल्यावर सोमवारी अंतिम सुनावणी झाली. फिर्यादी, साक्षीदार, पंच व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने पवार याला दोषी धरले. त्याला जन्मठेप व १ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. एस. जी. कडवे यांनी बाजू मांडली.