नाशिक : मार्चअखेर असल्याने महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या वीजबिल वसुलीचा सर्वसामान्य ग्राहकांना जाच झाला आहे. अवघे दोन-पाचशे रुपये थकलेल्या वीजग्राहकांच्या घरी जाऊन कर्मचारी बिल भरण्याचा तगादा लावत असतानाच अपमानास्पद शब्दप्रयोग करीत असल्याचा अनुभव सिडकोसह शहरातील अन्य भागातील ग्राहकांना येत आहे. मार्चमध्ये वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट वाढविण्यासाठी महावितरणकडून विशेष वीजबिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. ग्राहकांनी वीजबिलाची थकीत रक्कम भरावी यासाठी कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांकडे तगादा सुरू असून, संबंधित कर्मचारी मात्र चुकीच्या पद्धतीने वागत असल्याचा अनुभव अनेक ग्राहकांना येत आहे. सकाळी सकाळी ग्राहकांच्या दाराशी जाऊन संबंधित कर्मचारी हे ग्राहकांकडे वीजबिलाची मागणी करून बिल भरले की नाही याची विचारणा करीत आहेत. घर बंद असल्यास घरमालक परत येण्याची वाट न पाहता ग्राहकाची वीजजोडणी तोडली जात आहे. नाशिक शहर-१ आणि शहर-२ मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वीजबिल वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी काही कर्मचाºयांचीदेखील नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन बिल भरल्याबाबतची खात्री करून घेत आहेत. तसेच बिल न भरल्यास वीजजोडणी तोडण्याची कारवाई करीत आहेत. सिडकोत अनेक ठिकाणी ग्राहक घरी नसताना त्यांचे वीजमीटर बंद करण्यात आले आहे. मार्च महिन्याचे बिल भरायचे अद्याप बाकी असल्याचे काही ग्राहक सांगत असले तरी त्यांना कोणत्याही परिस्थितीत मार्च महिन्याचे बिल भरण्यास सांगितले जात आहे. यामुळे ग्राहक आणि कर्मचाºयांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. कर्मचारी सौजन्याने न वागता प्रत्येक ग्राहक जणू वीजचोर असल्याच्या मानसिकतेतूनच ग्राहकांची उलटतपासणी करीत आहेत. या प्रकारामुळे ग्राहक पुरते संतापले असून, वर्षभर वेळेत बिल भरले असताना मार्चसाठी अडवणूक कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक मोठ्या ग्राहकांकडे मोठ्या रकमेची थकबाकी असताना अवघ्या काही रुपयांसाठी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. ज्या कर्मचाºयांना वसुलीसाठी पाठविण्यात आले आहे त्यांच्याकडून ग्राहकांचा अवमान होत असल्याच्या तक्रारी असून, महावितरणकडून मात्र याबाबतची कोणतीही दखल घेतली जात नाही.ग्राहकांवर विश्वास नाहीआॅनलाइन पद्धतीने वीजबिल भरणाºया ग्राहकांनादेखील काही कर्मचाºयांच्या संकुचित मानसिकतेचा फटका बसला आहे. आॅनलाइन बिल भरल्याचे सांगितल्यानंतरही ग्राहकांकडे आॅनलाइनची पावती मागितली जात आहे. अनेक ग्राहक हे संगणकाच्या माध्यमातून घरी किंवा कार्यालयातूनच आॅनलाइन वीजबिल भरणा करतात. त्यांच्याकडेदेखील पावती मागितली जात आहे. यामुळे ग्राहक आणि कर्मचाºयांमध्ये वाद होत आहेत.
वीजबिल वसुलीसाठी शाब्दिक ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:40 AM