नाशिक : राज्यात मोठ्या प्रमाणात बागायती व कोरडवाहू शेती आहे. या शेतीच्या माध्यमातून प्रतिएकरी किमान चार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येऊ शकते. परंतु सध्याच्या स्थितीत शेतीत एक वर्षात फायदा झाला, तर चार वर्षे नुकसान होत असल्याने उत्पन्न घटले आहे. त्यामुळे रोजगारही घटला असून, समाजातील अस्वस्थता वाढत चालली आहे. यासाठी शेती क्षेत्राकडे उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले आहे. कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मराठा उद्योजक फोरमतर्फे आयोजित उद्योजक व नोकरी मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुल दवंगे आदी उपस्थित होते. हनुमंत गायकवाड म्हणाले, शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितल्यास शेतकऱ्यास अपेक्षित उत्पन्न मिळून इतरांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकेल. तसेच शेतीचा विकास समाजातील नैराश्याचे वातावरण झटकण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. शेतीचे शास्त्र समजून घेत, शेती विषमुक्त करण्यासह उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आपले काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून अल्पदरात माती व पाणी परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल दवंगे यांनी व्यवसाय उभारणीसाठी विविध योजनांची माहिती दिली. तरुणांमधून उद्योजक घडणे काळाची गरज असल्याचे मत खासदार गोडसे यांनी व्यक्त केले.उद्योजकतेचा नारा द्यावाव्यवसाय करताना चांगली संकल्पना, विश्वासू सहकारी, आर्थिक नियोजन आणि कष्टाची तयारी या सर्व घटकांची योग्य सांगड घालणे गरज असून, उद्योजक होऊ पाहणाºया युवकांनी कष्टाला दिशा देण्याचा प्रयत्न होण आवश्यक असल्याचे मत संमोहन तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले. तरुणांनी कोणत्याही कामाला न लाजता अभिमानाने ‘कौशल्यनिपुन मराठा, उद्योजक मराठा’ असा नारा युवकांनी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.