पुढील काळात कमळाचेच ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 01:10 AM2021-08-11T01:10:33+5:302021-08-11T01:11:04+5:30
भाजपचे नेते दिल्लीत गेले असले तरी, त्यातून महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ वगैरे घडण्याची कोणतीही शक्यता नाही. उलट काँग्रेसच्या संपर्कात अनेक लोक असल्याने येणाऱ्या काळात कमळाचेच ऑपरेशन होणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. विरोधी पक्षातील अनेक आमदार तसेच खासदार पक्षाच्या संपर्कात असून, आगे आगे देखो होता है क्या असेही ते म्हणाले.
नाशिक : भाजपचे नेते दिल्लीत गेले असले तरी, त्यातून महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ वगैरे घडण्याची कोणतीही शक्यता नाही. उलट काँग्रेसच्या संपर्कात अनेक लोक असल्याने येणाऱ्या काळात कमळाचेच ऑपरेशन होणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. विरोधी पक्षातील अनेक आमदार तसेच खासदार पक्षाच्या संपर्कात असून, आगे आगे देखो होता है क्या असेही ते म्हणाले. नाशिक येथील काँग्रेसच्या कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर आलेल्या पटाेले यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधला. संसदेत आरक्षणाबाबत घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले असले तरी, यापूर्वीच हे विधेयक मांडण्यात आले होते. त्यावेळी आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला असे भाजपचे नेते सांगत होते. तसे जर होते तर आता पुन्हा हे विधेयक मांडण्याची गरज काय? याचाच अर्थ भाजप तेव्हा खोटे बोलत होती हे स्पष्ट होते. फडणवीस सरकारने मराठा व ओबीसी या दोन्ही घटकांची फसवणूक केल्याचा आरोपही पटोले यांनी केला. पूर्वी भाजपचा कारभार नागपुरातून चालायचा आता तो दिल्लीतून दोनच व्यक्ती चालवित आहेत. ते व्यक्ती कोण आहेत हे साऱ्या देशाला ठाऊक असल्याचेही ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याबद्दल बोलताना पटाेले म्हणाले की, प्रत्येक पक्षाला स्वत:चा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी मी बोललो तेव्हा माझ्यावर टीकास्पद विश्लेषण करण्यात आले. आता तेच लोक माझीच भाषा बोलत असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही बेबनाव नाही. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा निर्वाळाही त्यांनी दिला.