माधवराव गायकवाड पंचत्वात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 04:51 PM2018-11-13T16:51:03+5:302018-11-13T16:52:23+5:30
मनमाड : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
मनमाड : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते, माजी आमदार माधवराव गायकवाड तथा बाबूजी यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.१३) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘बाबूजी अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
शिवाजी नगर भागातील त्यांच्या निवासस्थानापासूून सजवलेल्या वाहनातून बाबूजींची अंत्ययात्रा काढण्यात आली. महात्मा फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इंडियन हायस्कूल, रेल्वे स्टेशनरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एकात्मता चौक मार्गे काढण्यात आलेली अंत्ययात्रा पालिका इमारती समोर पोहोचली असता पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, मुख्याधिकारी दिलीप मेनकर, गटनेते गणेश धात्रक यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. एकात्मता चौकात व्यापारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष राजाभाऊ पारीक व व्यापारी वर्गाने पुष्पहार अर्पण केले. गुरु गोविंद सिंग विद्यालया शेजारच्या मैदानावर बाबुजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या साधना यांनी अग्निडाग दिला. यावेळी भाकप चे राज्य सचिव तुकाराम भस्मे, भालचंद्र कांगो, लक्ष्मण नाईक, भालचंद्र बनसोड, राजू देसले, डॉ. डी. एल. कराड, नीलिमा पवार, रवींद्र पगार, अनिल आहेर, राजाभाऊ देशमुख, संजय पवार, जगन्नाथ धात्रक, साहेबराव पाटील, मारु ती पवार, अफजल शेख, चंद्रकांत गोगड, कोंडाजी आव्हाड, गणेश धात्रक,शांताराम कातकडे, नितीन पांडे, नारायण पवार, जय फुलवानी आदी मान्यवर उपस्थित होते.
चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर
माधवराव गायकवाड हे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. त्या बरोबरच विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते असताना ही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची परवानगी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांची अंत्ययात्रा मैदानावर पोहोचल्या नंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्या साठी नाशिक येथून पथक निघत असल्याचा संदेश प्राप्त झाला. मात्र आयोजकांनी त्यास नकार दिला. राज्य शासनाने हेतू पुरस्सर परवानगी देण्यास टाळाटाळ केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.