महादेवपूर गटारमुक्त करणार : सांडखोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:31 AM2018-11-01T01:31:33+5:302018-11-01T01:32:09+5:30
नाशिक तालुक्यातील महादेवपूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच विलास सांडखोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन त्यात गावातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
गंगापूर : नाशिक तालुक्यातील महादेवपूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच विलास सांडखोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन त्यात गावातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. गावातील वेगवेगळ्या त्रुटी व शासनाच्या योजना व मागील इतिवृत्त ग्रामसेवक पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विशद केले. स्मशानभूमी दुरुस्ती करणे व संरक्षक भिंत बांधणे, रस्ता दुरुस्ती करणे, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या लाभार्थींनी कागदपत्रे आणून देणे, महादेवपूरच्या मुख्य रस्त्यापासून ते गावापर्यंत झाडे लावणे, गावात सीसीटीव्ही लावणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी पाटाच्या कडेला बेंच बसविणे, गावात कमान उभारणे, गटारमुक्त गावासाठी भूमिगत गटार करणे, महिला सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन वाटप करणे, जुन्या पाण्याच्या टाकीचे निर्लेखन करून नवीन अद्ययावत पाण्याची टाकी उभारणे, यावेळी गावात तंटामुक्ती समितीची निवड करण्यात आली. त्यासाठी अध्यक्ष म्हणून अर्जुन सांडखोरे व उपाध्यक्ष म्हणून बाळू बेंडकुळे यांची तर ग्रामरक्षक दलाच्या अध्यक्षपदी योगेश भागवत व उपाध्यक्षपदी दिलीप सांडखोरे यांची निवड करण्यात आली आहे. या सभेस शासकीय अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी सरपंच सांडखोरे यांनी केली. जिल्ह्यात प्रथमच बेघर व भटक्या समाजातील लोकांसाठी सार्वजनिक शौचालय उभारणे, घनकचरा, सांडपाण्याचे व्यवस्थापन करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणार असल्याचे सरपंचांनी ग्रामसभेत सांगितले. गावापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत पथदीप लावणे आदी विषयांवरही ग्रामसभेत चर्चा होऊन ठराव करण्यात आला.