Maharashtra Election 2019 : महायुतीच्या बंडखोर, मनसेच्या उमेदवारांमुळे चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 04:37 AM2019-10-09T04:37:22+5:302019-10-09T04:38:56+5:30

आघाडीने जागावाटपात राष्टÑवादीला नऊ, तर कॉँग्रेसला सहा जागा दिल्या आहेत.

Maharashtra Election 2019: Rebels of Mahayuti, silent on MNS candidates | Maharashtra Election 2019 : महायुतीच्या बंडखोर, मनसेच्या उमेदवारांमुळे चुरस

Maharashtra Election 2019 : महायुतीच्या बंडखोर, मनसेच्या उमेदवारांमुळे चुरस

Next

- श्याम बागुल

नाशिक जिल्ह्यात अर्ज माघारीनंतर पंधराही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. कॉँग्रेस आघाडीने भाजप, सेनेच्या बंडखोरांना दिलेली हवा आणि युतीच्या उमेदवारांना काही ठिकाणी स्वकीयांच्याच बंडखोरीला सामोरे जाण्याची आलेली वेळ पाहता यंदा आघाडी व युतीलाही आपापल्या जागा राखण्यासाठी झगडावे लागण्याची चिन्हे आहेत.
आघाडीने जागावाटपात राष्टÑवादीला नऊ, तर कॉँग्रेसला सहा जागा दिल्या आहेत. त्याच प्रमाणात सेनेने नऊ व भाजपने सहा जागांवर उमेदवार दिले आहेत. यंदाही मनसे रिंगणात असून, जिल्ह्यातील सात जागा ते लढवित आहेत. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष कॉँग्रेस आघाडीत सहभागी असला तरी, कळवण व नाशिक पश्चिम मतदारसंघात या पक्षाची राष्टÑवादीबरोबरच मैत्रिपूर्ण लढत होत आहे. तसेच बहुजन वंचित आघाडीनेही विधानसभेत उमेदवार उतरविले असल्याने त्यांच्या उमेदवारीचा फायदा व फटका कोणाला होतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. नाशिक शहरातील तीनही मतदारसंघ भाजपने आपल्या ताब्यात घेतल्याने सेनेची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यातून पश्चिम मतदारसंघात सेनेने बंडखोरी केली आहे, तर नांदगाव मतदारसंघातही सेनेच्या उमेदवाराविरुद्ध भाजपच्या उमेदवाराने बंडखोरी करून त्याची सेनेला परतफेड केली आहे. या निवडणुकीत राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ व पुत्र पंकज यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, मालेगाव बाह्यमधून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना कॉँग्रेसने आव्हान दिल्याने युती, आघाडीपुढे जागा राखण्याचे आव्हान आहे.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) आघाडीकडून शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्येचा मुद्दा प्रचारात.
२) केंद्र व राज्य सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीवर महायुतीचा भर.
३) गुजरातला जाणारे पाणी राज्यात वळविण्याचा मुद्दा महत्वाचा ठरणार.
४) बंद पडलेले कारखाने, बेरोजगारी नष्ट करण्याचे फक्त आश्वासनच.

नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपने आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारल्याने राष्टÑवादीने त्यांना उमेदवारी दिली. त्यांच्या समर्थनार्थ मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे राहुल ढिकले यांच्या विरोधात सानप अशी लढत रंगणार आहे.
पश्चिम मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या विरोधात सेना नगरसेवकाने अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने यंदाही येथे बंडाची परंपरा जोपासली आहे.
कळवण सुरगाणा मतदारसंघात माकपतर्फे आतापर्यंत सहा वेळा आमदारकी भुषविलेले जे. पी. गावित पुन्हा रिंगणात असून, त्यांचा सामना राष्टÑवादीचे दिवंग नेते ए. टी. पवार यांचे पुत्र नितीन पवार यांच्याशी होत आहे. ए.टी. यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार भाजपच्या खासदार आहेत.

रंगतदार लढती
येवला मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासमोर यंदा शिवसेनेचे संभाजी पवार यांचे आव्हान आहे. मात्र भुजबळ यांना आव्हान देत उमेदवारी मागणाºया माणिकराव शिंदे यांनी माघार घेतली आहे.
छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र पंकज भुजबळ हे नांदगाव मतदारसंघातून हॅट््ट्रिक करण्यासाठी रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर सेनेचे सुहास कांदे यांचे आव्हान आहे. मात्र या मतदारसंघात भाजपचे रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे सेना अडचणीत आली आहे.
इगतपुरीत कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करीत सेनेची उमेदवारी घेतली. मात्र सेनेच्या अन्य इच्छुकांना ती मान्य नाही. त्यामुळे माजी आमदार शिवराम झोले यांच्या पत्नीने तेथे अपक्ष उमेदवारी केल्याने गावित यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

Web Title: Maharashtra Election 2019: Rebels of Mahayuti, silent on MNS candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.