Maharashtra Election 2019: देवळालीत घोलपांचे संस्थान खालसा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 07:59 PM2019-10-04T19:59:33+5:302019-10-04T20:03:05+5:30

Maharashtra Election 2019: घोलपपुत्रची कसोटी : माजी आमदाराच्या कन्येने दिले आव्हान 

Maharashtra Election 2019: Will Gholap's institution be degraded in Deolali of nashik politics | Maharashtra Election 2019: देवळालीत घोलपांचे संस्थान खालसा होणार?

Maharashtra Election 2019: देवळालीत घोलपांचे संस्थान खालसा होणार?

Next

धनंजय वाखारे

नाशिक : गेली तीन दशके नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघावर घोलप नावाने गारुड केलेले आहे. या मतदारसंघातून तब्बल पाचवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या बबन घोलप यांचे मागील निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून लोकसभेवर जाण्याचे स्वप्न बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविल्याने भंगले. अपात्र ठरविले गेल्याने पुढे विधानसभा निवडणुकीत देवळालीतून बबन घोलप यांचे सुपुत्र योगेश घोलप यांनी विधानभवनात पाऊल ठेवत मतदारसंघ घोलप कुटुंबीयाकडेच कायम राखला. आता पुन्हा एकदा योगेश घोलप यांना शिवसेनेने उमेदवारी बहाल केली असली तरी या निवडणुकीत घोलपांचे संस्थान खालसा होते, की वडिलांचा वारसा पुढे नेण्यात पुन्हा एकदा सुपुत्र यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यावेळी घोलपपुत्राला यापूर्वी मतदारसंघाचे दोन वेळा विधानसभेत नेतृत्व करणा-या बाबुलाल अहिरे यांची कन्या व भाजपतून बंडखोरी करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी करणा-या सरोज अहिरे यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे माजी आमदारांच्या या पाल्यांमध्ये होणारी लढत लक्षवेधी ठरणार आहे.

महाराष्ट्र स्थापनेनंतर पहिली विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी भगूर मतदारसंघ अस्तित्वात होता. या मतदारसंघातून 1962 मध्ये काँग्रेसकडून दत्तात्रेय काळे निवडून आले होते. 1967 मध्ये पुनर्रचना होऊन देवळाली मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यावेळी कॉँग्रेसकडून एस.एन. देशमुख विजयी झाले. 1972मध्ये या मतदारसंघाने निवृत्ती गायधनी या अपक्ष उमेदवाराच्या झोळीत मतांचे दान टाकले. 1978 मध्ये पुन्हा एकदा अपक्षालाच संधी मिळाली आणि बाबुलाल अहिरे हे विजयी झाले. 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत बाबुलाल अहिरे यांनी कॉँग्रेस (यू) कडून उमेदवारी करत पुन्हा एकदा विधानसभा गाठली. 

1985 मध्ये भाजपचे भिकचंद दोंदे विजयी झाले. याचवेळी बबन घोलप यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढविली; परंतु ते सहाव्या क्रमांकावर फेकले गेले. मात्र, पुढे शिवसेनेच्या सहवासात आलेल्या बबन घोलप यांनी 1990 मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मिळविली आणि निवडणूक जिंकलीही. 1990 क्पासून देवळाली मतदारसंघात घोलप पर्वास प्रारंभ झाला. 1990 आणि 1999 मध्येही बबन घोलप यांनी शिवसेनेकडून उमेदवारी करत विधानसभेत प्रतिनिधित्व केले. युती सरकारच्या काळात घोलप यांनी समाजकल्याण खात्याचे मंत्रिपदही भूषविले. 

1999मध्ये मात्र एबी फॉर्मच्या तांत्रिक गोंधळामुळे घोलप यांना अपक्ष उमेदवारी करावी लागली. मात्र, अपक्ष असूनही घोलप यांनी आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली. 2004 आणि 2009 च्या निवडणुकीतही घोलप यांनी देवळाली मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राखण्यात यश मिळविले. 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी बबन घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर अपशकुन होत बेहिशेबी मालमत्ताचे प्रकरण समोर आले. न्यायालयाने घोलप पती-पत्नीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली पुढे राज्यपालांनी त्यांचे सदस्यत्वही रद्द केले.

2014च्या विधानसभा निवडणुकीत घोलप यांचे वारसदार म्हणून त्यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. या निवडणुकीतही बबन घोलप यांनी सुपुत्रच्या रूपाने मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. गेली तीन दशके देवळाली आणि घोलप हे राजकीय समीकरण जुळलेले आहे. आताही शिवसेनेने आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, शिवसेनेत असलेली अंतर्गत धुसफूस, नव्याने उभे राहू पाहणा-या नेतृत्वाची वाढती महत्त्वाकांक्षा, प्रस्थापितांविरोधात वाढत चाललेली नकारात्मकता आणि लोकसंपर्कात ढिली झालेली पकड यामुळे यंदाची लढाई घोलप पिता-पुत्रसाठी सोपी राहिलेली नाही. त्यातच राष्ट्रवादीने माजी आमदार बाबुलाल अहिरे यांच्या कन्या सरोज अहिरे यांना उमेदवारी देत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सरोज अहिरे या भाजपच्या विद्यमान नगरसेवक असून, त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घडय़ाळ हाती घेतले आहे. त्यामुळे देवळालीची निवडणूक लक्षवेधी ठरणार हे नक्की. 
 

Web Title: Maharashtra Election 2019: Will Gholap's institution be degraded in Deolali of nashik politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.