नाशिक : कोरोनामुळे अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे सध्या बाजारात अंड्याचे दरात वाढ झाली असून, उत्पादनातील तूट भरुन काढण्यासाठी महाराष्ट्राला परराज्यातून सुमारे एक कोटी अंडी आयात करावी लागत आहेत. अंडी उष्ण असल्यामुळे अनेक डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला रुग्णांना देतात. यामुळे अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अंड्यांचे दरही वाढले असून, सध्या फार्म लिफ्टींगला पाच रुपये १५ पैसे प्रतिनग इतका दर मिळत आहे तर किरकोळ बाजारात सहा ते सात रुपये प्रतिनग याप्रमाणे अंड्यांची विक्री होत आहे. ऊन्हाळ्यामुळे अनेक पोल्ट्री फार्मवर पाण्याची समस्या निर्माण होते. यामुळे अनेक पोल्ट्रीचालक उन्हाळ्यात पक्षी ठेवत नाहीत. याचा अंडी उत्पादनावर परिणाम होतो. महाराष्ट्राला साधारणत: दररोज तीन कोटी अंडी लागतात, त्यातील दोन लाखांपर्यंत महाराष्ट्रात उत्पादन होते तर आंध्र, तेलंगणा, गुजरात या राज्यांमधून साधारणत: एक कोटी अंडी आयात करावी लागतात. महाराष्ट्रात अंडी उत्पादन करणाऱ्या पोल्ट्री फार्मची संख्या कमी असल्यामुळे दरराेज अंड्यांची आयात करावी लागते. सध्या मागणी अधिकच असल्याने त्यात वाढ झाली आहे.
कोट -
मध्यंतरीच्या काळात पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला होता. याशिवाय कोंबडी खाद्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १,३०० रुपये क्विंटल असलेला मका १,७०० रुपयांवर तर सोयामिल ४० हजारांवरुन ७० हजार रुपये टनापर्यंत पोहोचले आहे. ही दोन प्रमुख खाद्य महागल्याने अंडी उत्पादनाचा दरही महागला आहे. पूर्वी एका अंड्याच्या उत्पादनासाठी तीन रुपये खर्च येत होता तो आता चार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
- उद्धव आहिरे, राज्य सचिव, महाराष्ट्र पाेल्ट्री फार्म ब्रिडर्स असोसिएशन