मक्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:43 PM2018-02-11T23:43:56+5:302018-02-11T23:53:12+5:30
नायगाव : मका बियाणे खराब निघाल्याने सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची मागणी करताच पिकास खतांची मात्रा जादा झाल्याने नुकसान झाल्याचा शासकीय अधिकाºयांच्या निष्कर्षाने शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे.
सोनगिरी येथील हिरामण सुकदेव बोडके यांनी गट नंबर ९६ मध्ये दोन एकर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली होती. मात्र हे पीक काढणीला येण्याच्या आतच मक्याची कणसे आपोआपच फुटू लागली. थोड्याच दिवसांत लागवड केलेल्या क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रातील मका पीक खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे बोडके यांच्या लक्षात आले. त्यांनी बियाणे खरेदी केलेल्या दुकानदारास मक्याच्या नुकसानीबाबत सांगितले. संबंधित दुकानदाराने कंपनीच्या अधिकाºयांना शेतकºयाची तक्रार सांगितली. संबंधित कंपनीच्या अधिकाºयांनी शिवार भेट घेऊन झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबत लवकरच कळवू असे सांगितले. मात्र पाच दिवस पाठपुरावा करत असताना नंतर हिरामण बोडके यांना उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. कंपनीचे अधिकारी भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
आपली फसवणूक झाल्याने बोडके यांनी सिन्नर कृषी अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला तक्रारी अर्ज करून चौकशी करून भरपाईची मागणी केली. संबंधित विभागातील अधिकाºयांनी बोडके यांच्या शेतावर येऊन नुकसान झालेल्या पिकाचा पंचनामा केला. मात्र पाहणीस आलेल्या उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत कानवडे, तालुका कृषी अधिकारी वटाणे, अकोला महाबीजचे तज्ज्ञ बी. एस. रासकर, कृषी पर्यवेक्षक के. जे. कसळकर आदी अधिकाºयांनी मका पिकाची पाहणी करून पंचनामा केला.
दोन दिवसांनी दिलेल्या पंचनाम्यात सदर शेतकºयाने मोठ्या प्रमाणात खते टाकल्याने मक्याची कणसे फुटत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा आशयाचा निष्कर्ष वाचून शेतकºयाने तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित कंपनीच्या बियाणांची कोणत्याही प्रकारची चौकशी न करता कोणतीही माती व पाणी परीक्षण न करता संबंधित अधिकाºयांनी पंचनामा दिल्याने परिसरातील शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. मका बियाणे खराब निघाल्यामुळे माझ्या दोन एकर क्षेत्रातील मका पिकाचे नुकसान झाले. संबंधित कंपनीच्या बियाणांचे परीक्षण न करता व कोणतेही माती व पाणी परीक्षण न करता शासकीय अधिकाºयांनी खतांची मात्रा जादा झाल्याने नुकसान झाल्याचा अहवाल दिल्याने मला या निर्णयाबाबत शंका वाटत आहे.
- हिरामण बोडके, सोनगिरी