नाशिक : धार्मिक महत्त्व असलेल्या गोदावरी नदीत केमिकलयुक्त पाणी मिसळत असल्याने प्रदूषण वाढले असून, गोदावरीसह नांदूर-मधमेश्वर येथे केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत स्वच्छता अभियान राबवून प्रदूषण मुक्ती साधण्याची मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संसदेत केली. गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून तिला दक्षिण गंगादेखील म्हटले जाते. परंतु वाढत असलेले जल प्रदूषण गोदावरीची समस्या बनले आहे. खूप साऱ्या कंपन्यांचे केमिकलयुक्त खराब पाणी या नदीपात्रात सोडले जाते. ज्यामुळे गोदावरीचे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि त्यामुळे त्वचेसंबंधीचे आजार होण्याची भीतीदेखील असते. पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी गोदावरी नदीचे संपूर्ण पात्र पानवेलींनी घेरलेले आहे असे सांगून खासदार डॉ. भारती पवार यांनी गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी केली.निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर येथे पक्षी अभयारण्य असून तेथे २०० पेक्षा अधिक जातींचे पक्षी येत असतात. त्याच ठिकाणी २५ पेक्षा अधिक माशांच्या प्रजाती देखील पहावयास मिळतात. या नांदूर मध्यमेश्वरला रामसरमध्ये घोषित केले आहे. परंतु या क्षेत्रातही जल प्रदूषणाचा धोका वाढत आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमार्फत स्वच्छता अभियान राबवून गोदावरी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी केली.
गोदावरीला प्रदूषणमुक्त करा : भारती पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 12:53 AM