संविधान टिकविण्यासाठी विवेक जागा करा : मंजूल भारद्वाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:45 PM2020-02-20T23:45:43+5:302020-02-21T00:30:01+5:30
नाशिक : भारतीय अशी ओळख असण्यापेक्षा विशिष्ट धर्म आणि संस्कृतीची ओळख लादून समाजात रुढीवादी विचार रुजविणाऱ्या प्रवृत्तींमुळे राज्यघटनेचा मूळ ...
नाशिक : भारतीय अशी ओळख असण्यापेक्षा विशिष्ट धर्म आणि संस्कृतीची ओळख लादून समाजात रुढीवादी विचार रुजविणाऱ्या प्रवृत्तींमुळे राज्यघटनेचा मूळ विचार खोडून काढला जात आहे. कुणी प्रश्नच विचारू नये यासाठी वैचारिक गुलामगिरीचे बीज रुजविण्याचे काम सुरू असल्याने अशा लोकांच्या हातात असलेले संविधान टिकणार नाही, असे प्रतिपादन आंतरराष्टÑीय विचारवंत मंजूल भारद्वाज यांनी केले.
सावाना औरंगाबाद सभागृह येथे संविधानप्रेमी नाशिककर यांच्या वतीने आयोजित डॉ. नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेचे ७४ पुष्प भारद्वाज यांनी गुंफले. ‘सीएए, एनआरसी, एनपीआर आणि आम्ही भारतीय’ या विषयावर व्याख्यानात भारद्वाज म्हणाले. नागरिकत्व विरोधात आम्ही नाही तर धर्माच्या आधारावर नागरिकता देण्याच्या विरोधात आहोत. धर्माच्या आधारावर नागरिकता देणे हे घटनाबाह्य आहे. तुम्ही भारतीय असण्यापेक्षा तुमचा आवाज कोणता आहे, असा विचार रुजविला गेला आहे. वैचारिक भावनेचा हा उन्माद जनमनाला कलुषित करीत आहे. विविधता हे संविधाचे मूलतत्त्व असताना विविधतेने नटलेला समाज नाकारण्याची मानसिकता रुजविण्यात आलेली आहे. गेल्या ७० वर्षांत देशात काहीच झाले नाही, असा विचार रुजविण्याची मानसिकता करण्यात आली. गेल्या सहा वर्षांत विषवल्ली अधिक पसरली आणि माणसाला व्यक्तिगत धर्माच्या चौकटीत अडकवून टाकण्यात आले. वैचारिक बुद्धीभेदाने क्षीण झालेला समाज कोणतेही प्रश्न विचारू शकत नाही, अशी सामाजिक मानसिकता निर्माण करण्यात आल्याने संविधान टिकविण्यासाठी आपल्यातील विवेक जागा करा, असे आवाहन भारद्वाज यांनी केले. प्रास्ताविक नितीन मते यांनी केले. संस्था परिचय राजू देसले यांनी करून दिला, तर पाहुण्यांचा परिचय शमसिया पठाण यांनी करून दिला. शाहीर श्रावस्ती मोहिते यांनी गीत सादर केले. सूत्रसंचालन किरण मोहिते यांनी केले, आभार सविता जाधव यांनी मानले.