हजारो मजुरांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 10:44 PM2020-04-30T22:44:27+5:302020-04-30T23:23:01+5:30
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या महिनाभरापासून निवारा केंद्रात थांबलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार नागरिकांना आपल्या मूळ गावी परतणे शक्य होणार आहे.
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या महिनाभरापासून निवारा केंद्रात थांबलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार नागरिकांना आपल्या मूळ गावी परतणे शक्य होणार आहे. आपल्या कुटुंबीयांपासून दूर असलेल्या या नागरिकांना लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे येथे थांबावे लागले असले तरी ते अत्यंत अगतिक झाले होते. मात्र आता त्यांची सुटका होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषत: नाशिक शहरासह अनेक निवारा केंद्रांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा आता संयम सुटत चालल्याने त्यांनी संघर्षाची भाषा सुरू केली होती. मात्र, ३ मेपर्यंत निर्णय न झाल्यास वेगळे चित्र निर्माण होऊ शकते. अशा वेळी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक स्थलांतरित कामगारांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या महिन्यात देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर रोजगार आणि मजुरीसाठी अडकलेल्या लाखो नागरिकांचे हाल झाले. दळणवळणाची सर्व साधने बंद असताना मिळेल त्या वाहनाने आणि प्रसंगी पायपीट करीत नागरिक आपल्या राज्याकडे आणि गावाकडे जात असल्याने शासनाने कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्यांना आहे त्याचठिकाणी थांबण्याचे आणि त्यांची तात्पुरती सोय करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने निवारा केंद्र उभारले होते. नाशिक शहरातील सुमारे पंधरा शाळांमध्ये अशाप्रकारे निवारा केंद्रे उभारण्यात आली असून, त्याठिकाणी सातशे कामगार आहेत. तर जिल्हाभरात एकूण २७ केंद्रे असून, ३ हजार १२६ व्यक्तींची निवासाची व्यवस्था असली तरी तूर्तास १ हजार ९०१ स्थलांतरित वास्तव्यास आहेत. यात महाराष्टÑात अन्य राज्यांतील ५०१ नागरिक आहेत. उर्वरित सर्व जण देशाच्या विविध राज्यांतील आहेत.
सध्या निवारा केंद्रात मूलभूत सुविधा आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी १४ तारखेला लॉकडाउनचा पहिला टप्पा संपेल तेव्हा सुटका होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढल्याने सर्वच स्थलांतरित अस्वस्थ आहेत.