जिल्ह्यात हिवताप मृत्यूचे प्रमाण शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:52 AM2019-04-25T00:52:43+5:302019-04-25T00:53:12+5:30

जागतिक  हिवताप दिन नाशिक : हिवताप अर्थात मलेरिया रोखण्यासाठी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून गेल्या पाच ...

 Malaria death rate is zero in the district | जिल्ह्यात हिवताप मृत्यूचे प्रमाण शून्यावर

जिल्ह्यात हिवताप मृत्यूचे प्रमाण शून्यावर

googlenewsNext

जागतिक  हिवताप दिन

नाशिक : हिवताप अर्थात मलेरिया रोखण्यासाठी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात मलेरिया मृत्यूचे प्रमाण शून्यावर आले आहे. तत्पूर्वीही मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. असे असले तरी या आजाराचा केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता असल्यामुळे जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वपूर्ण ठरला आहे. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतला असता हिवताप आजारामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत शून्य झाली आहे.
हिवताप हा आजार अ‍ॅनाफिलिस डासांची मादी चावल्यामुळे होत असतो. रक्त तपासणीनंतर आजाराची लागण झाली आहे अथवा नाही हे निष्पन्न होते. वरवर हा अत्यंत साधा आजार वाटत असला आणि मृत्यूची शक्यता शून्यावर आली असली तरी वेळीच या आजारावर उपचार झाले नाही तर जिवाला धोका होऊ शकतो त्यामुळे आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते. सन २०१६ पासून जिल्ह्यात हिवतापामुळे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आले असले तरी यापूर्वी म्हणजे सन २०११ ते २०१५ या कालावधीत आजाराने मृत्यू पावलेल्यांची संख्या ११ इतकी होती.
मागीलवर्षी ७ लाख ९८ हजार १५१ इतके रक्तनमुने घेण्यात आल्यानंतर त्यामध्ये ९ रक्ताचे नमुने हे दूषित आढळून आले होते. या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आल्यामुळे त्यांच्या जिवावरील धोका टळला.
मात्र रक्ताचे नमुने उद्रेक श्रेणीत गेल्यास अशा रुग्णांच्या जिवाला धोका वाढू शकतो.
त्यामुळे आजाराचा उद्रेक होण्यापूर्वीची काळजी हा आरोग्य विभागाचा महत्त्वाचा कार्यक्रम दरवर्षी १५ एप्रिल रोजी घेतला जातो.
आरोग्याची लक्षणे
हिवताप हा आजार अ‍ॅनाफिलीस डासांची मादी चावल्यामुळे होत असतो. या डासांची उत्पत्ती गावाच्या सभोवताली साचलेले पाण्याच्या साठे, नदी, नाले, तलाव आदी ठिकाणी होते. या डासांचे जीवनचक्र ८ ते १० दिवसांचे असते. या काळात डासांची मादी पाण्यामध्ये अंडे, अळी, कोप, डास या अवस्थांची निर्मिती करीत असते. नंतर प्रौढ डास तयार होतात. हिवताप आजारामध्ये तीव्र ताप, थंडी, घाम येणे, डोकेदुखी, मळमळ अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. प्लासमोडियम फॅल्सीफेरममध्ये क्वचित प्रसंगी हिवतापामुळे मृत्यू संभवतो.

Web Title:  Malaria death rate is zero in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.