दारणाकाठी नर बिबट्या जेरबंद; मादी मात्र पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 12:42 AM2021-09-17T00:42:28+5:302021-09-17T00:43:42+5:30
गेल्या काही महिन्यांपासून परिसरात दहशत माजविणारा नर बिबट्या दारणा नदीच्या काठावर निळकंठ माणिक आवारे यांच्या उसाच्या शेतात गुरुवारी (दि.१६) रोजी पहाटे ५ वाजता लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
भगूर : गेल्या काही महिन्यांपासून परिसरात दहशत माजविणारा नर बिबट्या दारणा नदीच्या काठावर निळकंठ माणिक आवारे यांच्या उसाच्या शेतात गुरुवारी (दि.१६) रोजी पहाटे ५ वाजता लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. दोन महिन्यांपूर्वी येथील मुंबादेवीच्या मंदिरात कहार समाजाचा बोकडबळी दैवी कार्यक्रमासाठी सुभाष इंदारखे व कचरु इंदारखे यांनी जवळच्या पवार चाळीत दोन बोकडे आणून बांधून ठेवले होते. मात्र रात्रीच्या सुमारास बिबट्याने दोघांवर झडप घालून ठार केले, तर दहा दिवसांपूर्वी अर्जुन कापसे यांचे पाळीव कुत्रे देखील बिबट्याने पळवून नेले. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. या घटनेनंतर राजेंद्र कापसे, अंबादास कस्तुरे, निळकंठ आवारे, दिनेश मोजाड, गोरख आवारे, शुभम कापसे, विक्रम आवारे यांनी वनविभागाकडे तक्रार दिली होती. त्याची दखल घेऊन दहा दिवसांपूर्वी निळू आवारे याच्या गट क्र.१०३ उसाच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. नेहमी प्रमाणे गुरुवारी (दि.१६) पहाटे नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याची जोडी असून, अनेकांनी त्यांनी वेळोवेळी दर्शन दिले आहे, नर बिबट्या सापडला मात्र मादी बिबट अद्याप मोकळी असल्याने नागरिकांमध्ये भीती कायम आहे.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपूर्वी अर्जुन कापसे यांच्या याच शेतातील पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करून नेला होता. या भागात मका, ऊस, गहू पिके असून, बाजूला दारणा नदीचा जंगलदाट खळखळून पाणी वाहणारा परिसर आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक बिबटे वास्तव्य करीत आहेत.