मालेगाव : येथील महापालिकेतर्फे आदिवासी समाजाला मूलभूत सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी आदिवासी एकता परिषदेतर्फे मंगला तलवारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त बोर्डे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.आदिवासी समाजाला मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी मनपाकडे करण्यात आली होती, परंतु मनपातर्फे कोेणतीही दखल घेण्यात आली नाही. शासनाने आदिवासींच्या विकासासाठी गेल्या ६७ वर्षांत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले; मात्र त्याची शासनस्तरावर अंमलबजावणी होत नाही. बेघर आदिवासी बेघर कुटुंबांना जागा देण्यात यावी, तालुक्यात व मनपा क्षेत्रात बेघरांना प्लॉट वितरित करून त्याची अंमलबजावणी करावी यासाठी समिती नेमण्यात आली होती. मोर्चात कैलास पवार, जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, महिला अध्यक्षा मंगला तलवारे, धनेश ठाकरे, एकनाथ वाघ यांच्यासह कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
मालेगावी आदिवासींचा मोर्चा
By admin | Published: December 08, 2015 11:52 PM