लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरातील रौनकाबाद भागात विनापरवानगी जाहीर सभा घेऊन हजारोंची गर्दी जमवून कोरोना नियमांचे खुलेआम उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह पाचजणांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश आहे.
काॅंग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी माजी आमदार शेख गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध भागात चौक सभा घेत आहेत. शुक्रवारी रात्री रौनकाबाद भागात एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पोलीस प्रशासनाने स्पष्टपणे परवानगी नाकारली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली असताना सभा घेता येणार नाही, अशी नोटीस माजी आमदार शेख यांना बजावली होती. तरीदेखील पोलीस प्रशासनाला व यंत्रणेला आव्हान देत माजी आमदार शेख यांनी जाहीर सभा घेत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले. या सभेला हजारोंची गर्दी जमवली. पक्षप्रवेशाची भूमिका स्पष्ट करताना शहर हिताच्या १५ अटी व शर्ती मान्य झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार असल्याचे शेख यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी सभास्थळी येत सभा घेऊ नका, गर्दी करू नका, असे आवाहन केले. मात्र, तरीही मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. या सभेची अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी गंभीर दखल घेतली असून, पुढील तपास पवारवाडी पोलीस करत आहेत.
-----------------
जमावबंदी आदेश झुगारत सभा
जमावबंदी आदेश असताना व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात माजी आमदार शेख यांच्यासह नगरसेवक फरीद मेंबर, माजी नगरसेवक रफिक भुऱ्या, रियाज अली, मेहमूद शहा, एकबाल बॉस या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------
मालेगावी सभेला संबोधित करताना माजी आमदार आसिफ शेख. (०६ मालेगाव १/२)
===Photopath===
060321\06nsk_1_06032021_13.jpg
===Caption===
०६ मालेगाव १/२