मालेगाव महापालिकेला वृक्ष गणनेचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 12:45 AM2022-05-25T00:45:01+5:302022-05-25T00:45:01+5:30
मालेगाव : नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन दोन दशके उलटली आहेत तरीदेखील महापालिकेने शहरात वृक्ष गणना केली नसल्याची धक्कादायक बाब ...
मालेगाव : नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन दोन दशके उलटली आहेत तरीदेखील महापालिकेने शहरात वृक्ष गणना केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेला वृक्ष गणनेचा विसर पडला आहे. नागरिकांना वृक्ष कर भरूनही सावलीपासून वंचित राहावे लागत आहे. केवळ पन्नास वर्षांपुढील १७२ वृक्षांची नोंद करण्यात आली आहे. सुमारे साडेसात लाख लोकवस्तीच्या शहरात झाडांची संख्या कमी असल्याने याचा थेट परिणाम पर्यावरणावर पडत आहे.
महाराष्ट्र राज्य (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ नुसार शहरात व्यक्तीमागे दोन वृक्ष असणे बंधनकारक आहे. त्यानुसार मालेगाव शहरात कमीत कमी ९ लाख वृक्षांची आवश्यकता आहे; मात्र महापालिकेने वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनाकडे सक्षम पाठ फिरवली आहे. वृक्ष लागवड, रेनवॉटर हार्वेस्टिंग, शहर स्वच्छता, मोसम नदी सुशोभीकरण, एकेरी वाहतूकसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. शहरातील पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत एकदाही पर्यावरण स्थिती दर्शक अहवाल सादर केला नाही. कुठल्याही प्रकारची पाण्यावर प्रक्रिया न करता सर्रासपणे मोसम नदीपात्रात सांडपाणी सोडले जाते. अयोग्य पद्धतीने होणारा घनकचरा संकलन, अवजड वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वृक्ष लागवड व संवर्धनाकडे झालेले दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे मालेगावी पर्यावरणाचा बोजवारा उडाला आहे. केंद्र व राज्य पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने शहराचा वार्षिक पर्यावरण अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मात्र या निर्देशांना महापालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जाते. महापालिकेच्या अंदाजपत्रकात पर्यावरण अहवालासाठी तरतूद करण्यात येते; मात्र वृक्ष लागवडीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे.
मनपाचे पर्यावरणाकडे दुर्लक्ष
नगरपालिका व महापालिका स्थापनेनंतरही शहरात एकदाही वृक्ष गणना झाली नाही. त्यामुळे शहरात किती वृक्ष आहेत याबाबत प्रशासनच अनभिज्ञ आहे. येथील तरुणाई व ग्रीन मालेगाव ड्राइव्ह व नैसर्गिकरीत्या जगलेली सुमारे १५ ते २० हजार झाडे असल्याचा दावा केला जात आहे. त्यापैकी ५० वर्षांपुढील दुर्मीळ झाडे १७२ असल्याचा दावा महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे. महापालिका क्षेत्रात दरवर्षी वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे. याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही.