मालेगावी पॉपलिन कापड यंत्रमाग आठवडाभर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:16 PM2021-06-04T16:16:21+5:302021-06-04T16:16:43+5:30
मालेगाव : कापडाची घटती मागणी, सुताचे वाढते दर व संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मालेगाव येथील दीड लाख पॉपलिन कापड उत्पादकांनी ...
मालेगाव : कापडाची घटती मागणी, सुताचे वाढते दर व संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मालेगाव येथील दीड लाख पॉपलिन कापड उत्पादकांनी येत्या ८ ते १४ जूनदरम्यान कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व मंदीच्या सावटामुळे वर्षभरात ३ वेळा कारखाने बंद ठेवण्याची नामुश्की कारखानदारांवर ओढवली आहे.
शहरातील जाफरनगर भागात बुधवारी (दि. २) रात्री पॉपलिन कापड उत्पादकांची हबीबुर रहेमान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत नुकसानीविषयी चर्चा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे कापडाची मागणी घटली आहे. कोरोनामुळे केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या ठिकाणाहून होणारी मागणी घटली आहे. घटत्या मागणीचा विचार करून आता आठवडाभर कारखाने बंद ठेवले जाणार आहेत. ८ ते १४ जूनपर्यंत हा बंद कायम राहणार आहे. शहरात ११ हजार ५०० कापड गाठी दररोज तयार होतात. या बंदमुळे सुमारे २८ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल थांबणार आहे. शहरात पॉपलिन कापड निर्मितीचे ५० टक्के यंत्रमाग आहेत. ३० टक्के पॉलिस्टर व २० टक्के रोटो कॅब्रिक कापडाचे आहेत.
इन्फो
यंत्रमाग मजुरांचे होणार हाल
सध्या ५ किलो सूत बंडलचा दर ११०० वरून १३०० वर गेला आहे. साधारण ११ हजार ५०० पॉपलिनच्या कापड गाठी तयार होतात. एका गाठीत ११० मीटरचे १५ ते १७ टाक असतात. कारखाने बंद असल्याने १ लाख गाठींच्या निर्मिती बंद होणार आहे. या बंदमुळे यंत्रमाग मजुरांचे हाल होणार आहेत.