मालेगाव सिंगल न्यूज- ५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:13 AM2021-03-15T04:13:55+5:302021-03-15T04:13:55+5:30
मालेगाव : शहरात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत असून गेल्या वर्षभरापूर्वीप्रमाणे मालेगाव पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. दोन ...
मालेगाव : शहरात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत असून गेल्या वर्षभरापूर्वीप्रमाणे मालेगाव पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. दोन महिन्यांपूर्वी दिवसाला एक ते दोन बाधित मिळून येत होते. परंतु गेल्या महिन्यापासून शंभर ते दोनशे कोरोनाबाधित रुग्ण मिळून येत असल्याने आरोग्य विभागाची धावपळ होत आहे. परिणामी नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
मालेगावी बंदची ऐशीतैशी
मालेगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी मालेगावसह जिल्ह्यात शनिवार व रविवारी दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. शहरातील काही भागात कडक लॉकडाऊन पाळण्यात येत असून काही भागात दुकाने अर्धवट सुरू ठेवून बंदची ऐशीतैशी केली जात आहे. तथापि, रस्त्यांवर भाजीपाला, फळविक्रेते दिसून आले नाहीत.
दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना
मालेगाव : शहर, परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून दुचाकीचालकांमध्ये घबराट पसरली आहे. शहरातील कॅम्प, सोयगाव, कलेक्टरपट्टा, सटाणानाका, रामसेतू या भागातून गेल्या काही दिवसांत दिवसागणिक दोन ते चार दुचाकी चोरीला जात आहेत. पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
जुना मुंबई - आग्रा महामार्गाची दुरवस्था
मालेगाव : जुना मुंबई-आग्रा महामार्गाची दुरवस्था झाली असून शहरातील नवीन बसस्थानकापासून दरेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी माेठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य पसरले असून मनपाकडून वेळीच घाण-कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. मनपाने शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
औषध फवारणीची मागणी
मालेगाव : गेल्या वर्षी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर महापालिकेतर्फे वेळोवेळी औषध फवारणी करून शहरातील घाण कचरा उचलला जात होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही भागात जंतुनाशक औषधांची फवारणी केली जात नाही. शिवाय आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात नाहीत. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा वेग वाढू लागला असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.