लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव कॅम्प : शहर व परिसरात सार्वजनिक मध्यवर्ती मोकळ्या भूखंडांवर केरकचरा टाकल्यास अथवा उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीस ५०० रुपये दंड करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. ३१ जुलैपर्यंत मालेगाव शहर हागणदारीमुक्त करू, असे प्रतिपादन मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले.येथील आयएमएच्या सभागृहात मनपातर्फे मालेगाव शहर हागणदारीमुक्त व स्वच्छतेसंदर्भात आयोजित कार्यशाळेत धायगुडे बोलत होत्या. व्यासपीठावर महापौर रशीद शेख, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, नगरसेवक ज्योती भोसले, सुनील गायकवाड उपस्थित होते. यावेळी धायगुडे म्हणाल्या, एवढ्यावर थांबून चालणार नाही. मी पदभार सांभाळल्यानंतर प्रथम शहराची माहिती घेतली. मालेगाव हे बकाल वस्तीचे गाव आहे हे मला माहीत होते. येथे आल्यावर सर्व अधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका घेऊन कामाच्या नियोजनाची तयारी केली. यामध्ये प्रत्येकांना जबाबदारी वाटून दिली आहे. या कामासाठी अधिकारी दिवसभर दहा-बारा तास काम करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत या सफाई अभियानात गुंतलेले आहे. मालेगाव शहर येत्या ३१ जुलैपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा चंग आम्ही बांधला आहे. १५ जुलैपर्यंत आम्हाला अपेक्षित यश मिळेलच. तसेच शहरातून जाणाऱ्या मोसम नदीच्या दुरवस्थेबाबत अनेक तक्रारी आहेत. ही नदी आम्ही दोन दिवसात स्वच्छ करू. त्यासाठी दहा-पंधरा लाख रुपये खर्च करू; पण पुढे काय? काही दिवसात पुन्हा तिची तीच अवस्था होणार आहे. नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे याचे भान ठेवावे. त्यामुळे केवळ मनपा प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागृत रहावे. जी व्यक्ती स्वत:हून शहराच्या स्वच्छतेला मुद्दाम गालबोट लावेल त्यासाठी त्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.यावेळी नगरसेवक अॅड. ज्योती भोसले, सुनील गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. मनपाचे चारही प्रभागातील अधिकारी, कर्मचारी, एनजीओ, उपायुक्त प्रदीप पठारे, विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपायुक्त अंबादास गरकळ यांनी केले.६५ ठिकाणे शहरात हागणदारीयुक्त आहेत. तेथे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आम्ही या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी गुडमॉर्निंग पथक व अशासकीय सामाजिक संस्था (एनजीओ), विविध सामाजिक क्लब, संस्था यांच्या मदतीने नागरिकांचे समुपदेशन केले जात आहे. यामुळे चार ते पाच ठिकाणे सध्या हागणदारीमुक्त झाली आहेत.हागणदारी व स्वच्छता अभियानाला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे. गेल्या अनेक वर्षात शहराला बकाल स्वरूप आले आहे. अतिक्रमण, रस्ते, गटारी आदि मुख्य समस्यांचे निराकरण करायचे आहे. त्यासाठी पूर्ण तयारीसह नियोजन करावे लागणार आहे. शहरातील अस्वच्छता व हागणदारीचा आलेख चिंता करायला लावणारा आहे. अभियान यशस्वी करा, शहर स्वच्छ ठेवा जेणेकरून राज्य व केंद्राची आर्थिक मदत मालेगावला मिळू शकेल. शहराच्या विकासाला हातभार लागेल. - रशीद शेख, महापौर
मालेगावला करणार हागणदारीमुक्त शहर
By admin | Published: July 06, 2017 12:16 AM