बिटकोच्या व्हेंटिलेटर्समध्ये बिघाड; प्रसंगावधानामुळे बचावले रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:58+5:302021-05-19T04:15:58+5:30
नाशिक : गेल्या महिन्यात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटना ताजी असतानाच आता महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात कोविड रुग्णांच्या ...
नाशिक : गेल्या महिन्यात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटना ताजी असतानाच आता महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात कोविड रुग्णांच्या अतिदक्षता विभागात मंगळवारी (दि.१८) व्हेंटिलेटर्समध्ये शॉर्टसर्किटसारखा बिघाड झाला आणि चार ते पाच व्हेंटिलेटर्स बंद पडले. त्यामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून ऑक्सिजनची पर्यायी सोय केली आणि रुग्णांना कोणताही धोका निर्माण होऊ दिला नाही. परिणामी सर्वच रुग्ण सुरक्षित असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले. गेल्याच शनिवारी (दि.१५) भाजप नगरसेविकेच्या पतीने या रुग्णालयात मोटार घुसवून तोडफोड केली होती. ती घटना होत नाही तोच व्हेंटिलेटर्सच्या शॉर्टसर्किटचा प्रकार घडला आहे. महापालिकेच्या सर्वात मोठ्या कोविड रुग्णालय असलेल्या नवीन बिटको रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर १६ व्हेंटिलेटर्स बेड आहेत. मंगळवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एका व्हेंटिलेटरमधून धूर येऊ लागला आणि पाठोपाठ चार ते पाच व्हेंटिलेटर्सदेखील बंद पडले. हा प्रकार कळताच महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान बाळगून या व्हेंटिलेटर्सऐवजी ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सोय केली आणि रुग्णांवर उपचारदेखील सुरू केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु तोपर्यंत बिटकोमधील व्हेंटिलेटर्सच्या आगीच्या घटनेबाबत उलटसुलट चर्चा पसरल्या आणि अधिकारी तसेच नगरसेवकांची धावपळ सुरू झाली. आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे आणि कोविड सेलप्रमुख डॉ. आवेश पलोड, डॉ. प्रशांत शेटे तसेच व विद्युत अभियंता वनमाळी, कुलकर्णी यांच्यासह डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील तंत्रज्ञांची टीमदेखील घटनास्थळी पाठवली; परंतु तोपर्यंत सर्व अडचण दूर झाली होती.
व्हेंटिलेटर्सला शॉर्टसर्किटमुळे तांत्रिक बिघाड होऊन काही वेळ अडचण आली असली तरी दहा मिनिटातच चार ते पाचही बंद पडलेले व्हेंटिलेटर्स पुन्हा कार्यान्वित झाले, त्याच बरोबर वेळीच उपाययोजना केल्याने सर्वच रुग्ण सुरक्षित असल्याची माहिती नवीन बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली.
कोट...
बिटको रुग्णालयातील हे व्हेंटिलेटर्स दिवसरात्र सुरू असतात. त्यातून कदाचित तापल्यामुळे एका व्हेंटिलेटरमधून धूर आला आणि अन्य काही व्हेंटिलेटर्स तात्पुरते बंद पडले, या दरम्यान रुग्णांना तत्काळ डबल ओटू देण्यात आला, त्यामुळे अडचण आली नाही. सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.
- डॉ.आवेश पलोड, कोविड सेलप्रमुख, महापालिका
इन्फो...
पुन्हा पीएम केअर व्हेंटिलेटर्स चर्चेत
नाशिक महापालिकेला पीएम केअर फंडातून मिळालेले हे व्हेंटिलेटर्स असून, त्यामुळे बिघडलेल्या या व्हेंटिलेटर्सचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीएम केअरमध्ये महापालिकेला गेल्यावर्षी ५६, तर यंदा साठ व्हेंटिलेटर्स मिळाले आहेत. त्यातील साठ व्हेंटिलेटर्स इन्स्टॉलेशनअभावी पडून आहेत, तर गेल्या वर्षी बिघडलेले चार व्हेंटिलेटर्स अजूनही नादुरुस्तच आहेत.
इन्फो...
शॉर्टसर्किटची शक्यता नाही
बिटको रुग्णालयात व्हेंटिलेटर्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता महापालिका कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी फेटाळून लावली आहे. महापालिकेच्या विद्युत अभियंत्यांनी तपासणी केली असता सर्व वायरिंग सुरक्षित असल्याचे आढळले आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असे त्यांनी सांगितले.