सिन्नर: तालुक्यातील पूर्व भागासाठी वरदान ठरणारे ५५ दलघफू क्षमतेचे माळवाडी धरण तब्बल बारा वर्षांनी पूर्ण भरुन ओव्हर फ्लो झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. घोटेवाडी, माळवाडी या दोन गावच्या पाणी योजनांबरोबरच शेती सिंचनासाठीही या जलसाठ्याचा मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्षरीत्या लाभ होणार आहे.२००६ साली झालेल्या जोरदार पावसाने माळवाडीचे धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यानंतर मात्र सातत्याने या भागात पर्जन्यमान घटल्याने धरणात मृतसाठाही होत नसे. गेल्यावर्षी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने भोजापूरच्या पूर पाण्याने हे धरण निम्मे भरले होते. अत्यल्प पावसामुळे या भागातील नागरिकांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. यंदा मात्र प्रारंभीपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे १ सप्टेंबर रोजी धरण ओवर फ्लो झाले. तब्बल १२ वर्षानंतर या भागात पाणी- पाणी झाल्याने माळवाडी, निर्हाळे, मर्हळ, घोटेवाडी, वावी, वल्हेवाडी आदी गावांच्या परिसरात धरणाच्या पाण्याचा पाझर पोहोचला असून तेथील जलस्रोतांना बळकटी आली आहे. दरम्यान गेल्या वर्षभरात समृद्धी महामार्गासाठी या धरणातून मोठ्या प्रमाणात माती, मुरूम काढण्यात आल्याने धरणाची साठवण क्षमता कमालीची वाढली आहे. त्यामुळे किमान पुढचे दोन वर्ष माळवाडी परिसरात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे येथील जाणकार शेतकर्यांनी सांगितले. दरम्यान, धरणाच्या सांडव्याची दुरवस्था झाली असून लोकप्रतिनिधींनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याची तातडीने दुरुस्ती करून गळती थांबवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
एक तपानंतर माळवाडी धरण ओव्हर फ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 3:42 PM