मनविसेतही लवकरच फेरबदल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:24 AM2017-11-27T00:24:02+5:302017-11-27T00:24:27+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आढावा बैठका तसेच अन्य आंदोलनाच्या पवित्र्यानंतर आता मनविसेही सरसावली आहे. बसवाहतुकीच्या अडचणींसदर्भात आंदोलनाची तयारी करतानाच आता महिनाभरात कामकाजाचा आढावा घेत नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्याचे संकेत आदित्य शिरोडकर यांनी दिले आहेत.
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आढावा बैठका तसेच अन्य आंदोलनाच्या पवित्र्यानंतर आता मनविसेही सरसावली आहे. बसवाहतुकीच्या अडचणींसदर्भात आंदोलनाची तयारी करतानाच आता महिनाभरात कामकाजाचा आढावा घेत नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्याचे संकेत आदित्य शिरोडकर यांनी दिले आहेत. मनसेच्या ‘राजगड’ कार्यालयावर रविवारी (दि.२६) शिवसेनेच्या युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांसह शेकडो नवीन विद्यार्थ्यांनी शिरोडकर यांच्या उपस्थितीत मनविसेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिरोडकर यांनी नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर मनविसेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव मेढे, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, शहराध्यक्ष श्याम गोहाड, संदीप भवर, दीपक चव्हाण, सागर देवरे, मनोज रामराजे आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांचे नेतृत्व सर्वांना समान संधी देणारे आहे. त्यामुळे नवीन-जुना असा कुठलाही भेदभाव संघटनेत चालत नाही. जो प्रामाणिकपणे काम करून संघटन बळकट करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवतो त्याला नक्कीच जबाबदारी सोपविली जाते, असे शिरोडकर यांनी सांगून महिनाभरानंतर प्रत्येक नवीन कार्यकर्त्याशी चर्चा करून सामाजिक कार्याचा आढावा घेत नवीन पदे व जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
महाविद्यालयीन निवडणुका घ्याव्यात
महाविद्यालयीन वयात राजकीय नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी महाविद्यालयीन निवडणुका महत्त्वाच्या ठरतात. या निवडणुका घेतल्या जाव्यात, यासाठी मनविसेची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे. मात्र निवडणुकांचा कार्यक्रम महाविद्यालयीन स्तरावर आखताना आचारसंहिता कडक असणे देखील तितकेच गरजेचे आहे. आचारसंहिता कमकुवत असेल तर महाविद्यालयीन स्तरावरील निवडणुका अयशस्वी ठरतात. त्यामुळे आचारसंहिता कडक करून निवडणुका घेण्यास काहीही हरकत नाही, असे शिरोडकर यांनी यावेळी सांगितले.