लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य तसेच शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळाच्या कारभारावरून बुधवारी (दि.५) जिल्हा परिषदेची आमसभा वादळी ठरली. सदस्याला केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सभेतच दिलगिरी व्यक्त करावी लागली. तर शाळा खोल्या निर्लेखन, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुख्यालयात अनुपस्थिती, अंगणवाडी कामातील गैरप्रकार, पोषण आहारात उंदीर सापडणे, आदी विषयांवर सभेत वादळी चर्चा झाली.दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज विद्युत वितरण कंपनीबाबतच्या असलेल्या समस्या व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येत्या १२ जुलैला महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांसह सर्व अधिकाऱ्यांची स्वतंत्र सर्वसाधारण सभा घेण्यात येईल, अशी घोषणा अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केली.रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, सभापती यतिन पगार, अर्पणा खोसकर, मनीषा पवार, सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच वीज वितरण विभागातील अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्य अभियंत्यांची बैठक असल्याने कार्यकारी अभियंते बैठकीला अनुपस्थित असल्याचे सर्वसाधारण सभेस उपस्थित त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरले होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केली. धनराज महाले, सिमंतीनी कोकाटे, भास्कर गावित, सुरेश कमानकर, दीपक शिरसाट, डी. एम. जगताप यांनी वीज वितरणाबाबत अनेक प्रश्न व समस्या असून, त्या सोडविण्यासाठी वीज वितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी असणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासंदर्भात येत्या १२ जुलै रोजी जिल्हा परिषदेची विशेष बैठक बोलविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी जाहीर केले.
आमसभा वादळी
By admin | Published: July 06, 2017 12:09 AM