प्रचारासाठी भाजपाकडे अनेक मुद्दे : श्याम जाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:11 PM2019-02-11T23:11:56+5:302019-02-12T00:28:29+5:30
गेल्या साडेचार वर्षांत कधी नव्हे इतके मोठे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपाकडे अनेक मुद्दे असून, देशपातळीवर पक्षाची ताकद पाहता, येणाऱ्या निवडणुकीतही भाजपाच्या कुंडलीत सत्तेचा योग असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी केला.
नाशिक : गेल्या साडेचार वर्षांत कधी नव्हे इतके मोठे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपाकडे अनेक मुद्दे असून, देशपातळीवर पक्षाची ताकद पाहता, येणाऱ्या निवडणुकीतही भाजपाच्या कुंडलीत सत्तेचा योग असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी केला.
नाशिक, दिंडोरी, शिर्डी, अहमदनगर या चार लोकसभा मतदारसंघांतील शक्ती केंद्रप्रमुखांच्या संमेलनात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृहराज्यमंत्री राम शिंदे होते. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात बोलताना जाजू पुढे म्हणाले, देशातील १७ राज्यांमध्ये भाजपा सत्तेत असून, लोकांचा जनाधार पक्षाला लाभला आहे आणि पक्षाची ताकदच गावोगावी उभी राहिलेली शक्ती केंद्रप्रमुख आहेत. कॉँग्रेसने गेल्या ५० वर्षांत कोणतेही काम न करता निव्वळ डंका पिटला, पण भाजपाने संपूर्ण जगातच भारताची नव्याने ओळख करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. राम शिंदे यांनी, विरोधकांकडून खोटे नाटे आरोप केले जात आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना जमिनीवर येऊन काम करावे लागणार असून शेवटच्या घटकापर्यंत पक्ष व सरकारने केलेले काम पोहोचविण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. खासदार दिलीप गांधी यांनीही यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाचे कामच विजयाला हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार रामदास आंबाडकर, प्रकाश मौले, मोहन चौधरी आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक लक्ष्मण सावजी यांनी केले. कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, मोनिका राजोळे, सुनील बागुल, प्रथमेश गिते, दादा जाधव यांच्यासह चारही लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार अनुपस्थित
भाजपाने नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील शक्तीप्रमुखांचे संमेलन भरविले असले तरी, नाशिकच्या जागेबाबत अद्याप भाजपाने ठोस दावा केलेला नाही. एकीकडे सेनेशी युतीची बोलणी सुरू असताना दुसरीकडे भाजपाने नाशिक लोकसभेसाठी शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या संमेलनाकडे दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पाठ फिरविली, तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील येण्याचे टाळले. दिवसभर संमेलन असल्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र प्रा. राम शिंदे यांनी अल्पवेळ हजेरी लावून काढता पाय घेतला, तर उपाध्यक्ष श्याम जाजू मार्गदर्शन करून निघून गेल्यावर व्यासपीठही सुनेसुने झाले होते.