जागतिकीकरणात मराठी व्हावी ज्ञानभाषा
By admin | Published: January 11, 2015 12:32 AM2015-01-11T00:32:30+5:302015-01-11T00:32:42+5:30
वाचक दिन : ‘जागतिकीकरण, भाषा आणि साहित्य’ परिसंवादातील सूर
नाशिक : इंग्रजी ही ‘किलर लॅँग्वेज’ नाही. ती तिच्या कर्तृत्वाने पुढे आली आहे. मराठीच्या नावाने गळे काढणारी मंडळी मराठी भाषेच्या समृद्धीसाठी काय प्रयत्न करतात, असा सवाल उपस्थित करीत मराठी ही येत्या काळात ज्ञानभाषा न झाल्यास तिची गतही अन्य भाषांप्रमाणेच होईल, असा सूर परिसंवादात निघाला.
ग्रंथाली प्रकाशन व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथाली’च्या वाचक दिनानिमित्त ‘जागतिकीकरण, भाषा आणि साहित्य’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकात करण्यात आले होते. परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार, लेखक अरुण साधू, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर, ज्येष्ठ लेखक रमेश पानसे, संगीतकार कौशल इनामदार, दीपक घारे, श्रुती आवटे आदिंनी मते मांडली. यावेळी बारावीची विद्यार्थिनी व ‘लॉगआउट’ पुस्तकाची लेखिका आवटे म्हणाली की, आमच्या पिढीला जागतिकीकरणात झालेल्या बदलाचा अनुभव नाही. आम्ही भावनावश न होता व्यक्त होतो. तरुणांनी आपण जे अनुभवतो ते लिहायला हवे. हे लिखाण बाजारात आल्यास इंग्रजी पुस्तकेही मागे पडतील.
ज्येष्ठ चित्रकार बहुळकर यांनी देशावरील परकीय आक्रमणांचा इतिहास मांडत संस्कृतीची सरमिसळ व त्यातून भाषेवर झालेले परिणाम यावर प्रकाश टाकला. आमदार हेमंत टकले यांनीही या विषयावर मत मांडले. ते म्हणाले, लहान मुलांतील मराठी भाषेत विचार करण्याची विचार करण्याची प्रवृत्ती संपत चालली आहे. ती ‘कॉमिक्स’ वाचतात. त्यामुळे मराठीचे भवितव्य अवघड बनले आहे. वीणा सानेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ‘शब्द रुची’ मासिकाच्या ‘भाषा आणि साहित्य’ विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आली. (प्रतिनिधी)