लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : सर्वत्र कोरोनाने थैमान घातल्यानंतर सुरक्षा घेण्याच्या दृष्टीने दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठ, मंगल कार्यालये बुधवारी बंद ठेवण्यात आली.
दरम्यान गुरुवारपासून आवश्यक खबरदारी घेऊन व्यवहार सुरळीत ठेवण्यात येणार आहेत.दिंडोरीतील व्यापाऱ्यांनी बुधवारी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे दुपारपर्यंत शहरातील रस्त्यांवर कमी प्रमाणात वर्दळ दिसून आली. दुपारनंतर काही प्रमाणात दुकाने सुरू झाली होती, मात्र दिंडोरी व्यापारी असोसिएशनने नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. दुकाने सुरू करण्याची विनंती केली, त्यानुसार काही अटी टाकून दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
प्रत्येक व्यावसायिकांनी मास्क वापरावे तसेच ग्राहकांना जास्त गर्दी करू न देता त्यांनाही मास्क वापरण्यास सांगावे, हात धुण्याची व्यवस्था करावी, स्वच्छता ठेवावी आदी सूचना करण्यात आल्या. यावेळी सुनील आव्हाड, नरेश देशमुख, दिलीप जाधव, रणजित देशमुख, विशाल जाधव, अनिल धोंगडे, रवि गायकवाड आदींसह व्यापारी उपस्थित होते.श्री स्वामी समर्थ केंद्र ३१ मार्चपर्यंत बंददिंडोरी येथील रविवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.