घोटी : इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घोटीत शनिवार व रविवार असे दोन दिवस भरणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीकडून घेण्यात आल्याने घोटीकरांनी बाजारात कडकडीत बंद पाळला. ग्रामस्थांनीही सुरक्षितता बाळगून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने केले आहे.
घोटीत आठवडा बाजाराचा दिवस असूनही ठरल्याप्रमाणे सर्वच दुकानदार व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पिटल, मेडिकल, किराणा दुकाने, भाजीपाला सेवा सुरू होत्या तर अन्य दुकाने बंद होती. स्थानिकांनी या बंदला सकाळपासूनच सकारात्मक प्रतिसाद दिला. सोमवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ यावेळेत सर्व दुकाने पूर्ववत सुरू होणार आहेत. शासकीय नियमांचे पालन करून बाजारपेठ दोन दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीने घेतला होता. या आदेशाचे पालन सर्वत्र केल्याचे दिसून आले. याबरोबरच ग्रामपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकान्वये दिनांक १५ मार्चपासून घोटी परिसरात होणारे लग्न समारंभ हे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या परवानगीनेच करावे लागणार असून, त्या लग्नाची मुहूर्तवेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ यावेळेतच असावी, असे आदेश या पत्रात नमूद केले आहेत. रविवारपासून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रम व उत्सव पूर्णतः बंद ठेवण्यात येतील. याबरोबरच घोटी गावातील धार्मिक स्थळे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ यावेळेतच खुली राहणार आहेत. धार्मिक विधींमध्ये केवळ ५ लोकांचा समावेश असणार आहे.
इगतपुरी तालुक्यातील कोरोनाची स्थिती
इगतपुरी तालुक्यात २६ रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यामध्ये घोटीमधील सातजणांचा समावेश आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील रुग्ण कमी असले, तरी रुग्णांची वाढ झपाट्याने होत असल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली असून, कोविड आयसोलेशन सेंटर नव्याने सुरू करण्यात येत आहे.
कोट...
शनिवारी आठवडा बाजार बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, ग्रामस्थांचे असेच सहकार्य मिळाल्यास घोटीला कोरोनापासून लांब ठेवण्यामध्ये मोठा हातभार लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे ग्रामपंचायत काटेकोरपणे पालन करत आहे. सर्वांनी असेच सहकार्य करावे, जेणेकरून घोटी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्यापासून रोखता येईल.
- रामदास भोर, उपसरपंच, घोटी
===Photopath===
140321\14nsk_2_14032021_13.jpg
===Caption===
घोटी बाजारपेठेत शुकशुकाट