संक्रांतीसाठी बाजारपेठ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:49 PM2020-01-13T22:49:49+5:302020-01-14T01:17:24+5:30
येत्या १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सण साजरा होत आहे. नवीन वर्षात येणारा पहिलाच सण असल्याने बाजारपेठेत लगबग सुरू आहे. यानिमित्ताने सार्वजनिक संस्थातर्फे विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात कार्यकर्ते व्यस्त झाले आहे.
संगमेश्वर : येत्या १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सण साजरा होत आहे. नवीन वर्षात येणारा पहिलाच सण असल्याने बाजारपेठेत लगबग सुरू आहे. यानिमित्ताने सार्वजनिक संस्थातर्फे विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात कार्यकर्ते व्यस्त झाले आहे.
मकरसंक्रांतीला तिळगूळ वाटप करून शुभेच्छा दिल्या जातात. मालेगाव शहराच्या बाजारपेठेत तयार हलवा, तिळगुळाचे लाडू, चिक्की तसेच मुरमुऱ्यांचे लाडू विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. संगमेश्वरातील महात्मा फुले रोड, मोसमपूल, सटाणा नाका, रावळगाव नाका, कॅम्प मेनरोड, मोची कॉर्नर, सरदार थिएटर चौक, रामसेतू पूल, गुळबाजार आदी ठिकाणी वस्तूचे विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच किराणा दुकानातुन तिळगूळ, मुरमुरे, डाळ्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. महिलावर्गाची संक्रांतीचे वाण खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.
तरुणाई पतंग उडविण्याचा आनंद घेतात. बाजारपेठेत विविध आकारातील आकर्षक पतंग, मांजा विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांची पतंग खरेदीसाठी बाजारात धाव घेतली आहे. या निमित्ताने बालाजी फाउण्डेशनतर्फे रक्तदान शिबिर, सेवादलातर्फे, साधना वाचनालयातर्फे तिळगूळ वाटप व स्नेह मेळावा आदी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात कार्यकर्ते मग्न झाले आहेत.