नाशिक : जिल्ह्यात रविवारी पुन्हा संततधार व धुवाधार पाऊस झाला असून, सर्व नद्या भरभरून वाहू लागल्या आहेत. त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरात पावसात भिजण्यासाठी व पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केली. सुटीचा दिवस असल्याने हौशी नागरिकांनी आपल्या गाड्या थेट त्र्यंबकेश्वरच्या दिशेने वळविल्या. त्र्यंबकेश्वरला दिवसभरात प्रचंड पाऊस झाला. ओझर परिसरात बाणगंगा नदीला पूर आल्याने गावातील तीनही पूल पाण्याखाली बुडाले.इगतपुरी : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह इगतपुरी शहर आणि कसारा घाट परिसरात आज पुन्हा मुसळधारेसह संततधार व धुवाधार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत पुन्हा १७१ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून धुवाधार पाऊस होत असल्याने इगतपुरी, घोटी शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाबरोबर दाट धुकेही आल्याने सर्वाधिक वर्दळीचा महामार्गसुद्धा मंदावल्याचे चित्र होते. शहरात आजअखेर (दि. १०) ८९२ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे गेल्या २४ तासांत शहरात तब्बल १७१ मिलिमीटर पावसाची धुवाधार बरसात झाली आहे. दरम्यान, या सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ होत आहे. दरम्यान, २४ तासात घोटी शहरात १०० मिमी, तर धरण परिक्षेत्रात १४३ मिमी, तसेच इगतपुरी शहरात विक्रमी १७१ मिमी, दारणा धरण क्षेत्रात व परिसरात ४३ मिमी, भावली धरण परिसरातही विक्रमी १८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यांमध्ये भरीव वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.लोहोणेर : लोहोणेर व परिसरात आज दुपारनंतर तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने व सर्वसामान्य जनतेने समाधान व्यक्त केले आहे. काल दुपारी लोहोणेर व परिसरात पावसाने आपली हजेरी लावली. गेल्या एक महिन्यापासून बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला होता. आर्द्रा नक्षत्राच्या भरवशावर केलेली पेरणी वाया जाते की काय, अशी भीती बळीराजा व्यक्त करीत होता. मात्र आज पावसाने दिवसभर आपली हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून चणकापूर धरण क्षेत्रात तसेच कळवण व देवळा तालुक्यात पावसाने आपली हजेरी लावल्याने कसमादेची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, पात्र दुथडी भरून वाहु लागले आहे. एकंदरीत आज पावसाने दिवसभर आपली हजेरी लावल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.निफाड : तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्याने व तोही दमदारपणे पडत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. निफाड येथे रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ८०.८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.मागे ८ ते १० दिवसांपूर्वी पावसाने सुरुवात केली होती; परंतु तो पाऊस लगेच थांबल्याने बळीराजा धास्तावला होता. आता शनिवारी रात्री १ च्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रविवारी तालुक्यात दिवसभर पडत असलेला पाऊस कधी एकदम जोरदार, तर कधी मध्यम स्वरूपाचा होता. संततधार पाऊस पडत असल्याने तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्या-नाले भरले तुडुंबपेठ : सलग ४८ तासांपासून तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे़ पेठ शहर व तालुक्यात शनिवारपासून संततधार पावसाने सुरुवात केली असून, रविवारी सकाळपासून पावसाचा जोर अधिकच वाढल्याने सर्व तालुका जलमय झाला आहे़ मुसळधार पावसाने सर्व व्यवहार ठप्प झाले असले, तरी दुष्काळाने होरपळून निघालेल्या जनतेला हा पाऊस हवाहवासा वाटत आहे़(लोकमत चमू)
जिल्ह्यात मुसळधार
By admin | Published: July 10, 2016 9:48 PM