नाशिक : सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले निफाड तालुक्यातील कसबेसुकेणे गावातील हजरत पीर मौलाना अलिमोद्दीन शाह कादरी चिश्ती उर्फ मौलानाबाबा यांचा ३६वा उरूस सोमवारी (दि.९) साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कव्वाल वसीम साबरी आणि अजिम नाजा यांच्यात सुफी कव्वालींचा मुकाबला रंगणार आहे. दर्गा परिसरात जय्यत तयारीला वेग आला असून रंगरंगोटीची कामे अंतीम टप्प्यात सुरू आहेत.कसबे-सुकेणे पंचक्रोशीसह संपुर्ण जिल्ह्यातील सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्ये मौलानाबाबा यांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी हजेरी लावतात. जागृत देवस्थानांपैकी एक देवस्थान अशी पंचक्रोशीत ख्याती आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सुकेणा येथील मौलानाबाबा उत्सव समिती, मुस्लीम पंच समितीच्या वतीने बाबांचा वार्षिक उरूस पारंपरिकपध्दतीने साजरा केला जात आहे. यानिमित्ताने दर्गाच्या परिसरात विविध कामे सुरू आहेत. दर्ग्यावर पांढरा शुभ्र रंग चढविण्यात आला आहे. तसेच प्रवेशद्वारावरदेखील रंगरंगोटी पुर्ण झाली आहे. दर्ग्याच्या आवारातील स्वच्छताविषयक सर्व कामे आटोपली असून उरूससाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात येणार आहे. दर्ग्यावर आकर्र्षक रोषणाईच्या कामाला सुरूवात झाली आहे. येत्या ९ तारखेला सकाळी ११ वाजता दर्ग्यापासून सुकेणा गावापर्यंत पवित्र चादरची मिरवणूक (जुलूस) पारंपरिक पध्दतीने काढण्यात येणार आहे. सायंकाळच्या सुमारास बाबांच्या मजारवर संदल व चादर अर्पण क रण्यात येऊन फातिहा व दुरूदोसलामचे सामुहिक पठण केले जाणार आहे. यानंतर आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादचे (लंगर) वाटप करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. महाप्रसाद वाटपानंतर रात्री आठ वाजेपासून कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे. वार्षिक उरूसच्या यशस्वीतेसाठी मौलानाबाबा सोशल वेल्फेअर समिती प्रयत्नशील आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उरूससाठी उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.