लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सर्व प्रकारच्या सभा, समारंभ तसेच मंत्र्यांना त्यांचे दौरे रद्द करण्याचे आदेश दिल्यामुळे पोलीस यंत्रणेने सुस्कारा टाकला आहे. त्याचबरोबर नागरिकांची गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आल्याने पोलिसांच्या बंदोबस्ताचा ताणही कमी झाला असून, त्यामुळेच पोलीस कोरोनापासून स्वत:च्या बचावाची काळजी घेऊ लागले आहेत.
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने त्यापासून खबरदारीच्या उपाययोजनाही युद्धपातळीवर राबविल्या जात आहेत. शासनाने गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली असून, धार्मिक सण, उत्सवांनाही बंदी घालण्यात आली आहे. गर्दी होणारे सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, जिम बंद ठेवण्यात आले आहेत तर शासकीय कार्यक्रम, मंत्र्यांचे दौरे, सभा व समारंभही पुढील काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत. शासनाच्या या उपाययोजनांमुळे कोरोनावर प्रतिबंध घालणे शक्य झाले असून, नागरिकांकडूनही शासनाच्या या उपाययोजनांना प्रतिसाद मिळू लागल्याचे रस्त्यांवरील रोडावलेल्या गर्दीमुळे दिसू लागले आहे. गेल्या चार दिवसांत शहरात कोणताही सार्वजनिक कार्यक्रम झालेला नाही त्याचबरोबर दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांनीदेखील शासकीय बैठकांव्यतिरिक्त सार्वजनिक समारंभाला हजेरी लावलेली नाही. एरव्ही गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्याच्या दौ-यावर आठवड्यातून सरासरी तीन मंत्र्यांची हजेरी व त्यांच्या उपस्थित होणा-या कार्यक्रमांची रेलचेल असायची. परंतु कोरोनाच्या दहशतीमुळे सारे शांत झाले असून, त्याचा परिणाम पोलिसांचा ताणतणाव कमी होण्यावर झाला आहे. मंत्री वा सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम म्हटल्यास कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांना डोळ्यात तेल घालून पार पाडावी लागत होती. त्यासाठी प्रसंगी चौदा ते सोळा तास बंदोबस्तावर तैनात रहावे लागत. आता मात्र गेल्या चार दिवसांपासून सार्वजनिक समारंभ बंद झाल्याने त्याचबरोबर गर्दी होणाºया ठिकाणांवर शुकशुकाट पसरल्याने पोलिसांचा ताण कमी झाला आहे.