कळवण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे १० मार्च रोजी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत कळवण शहरात शेतकरी संवाद मेळाव्यासह कळवण नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी नाकोडा येथील शासकीय विश्रामगृहात आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नेते नारायण हिरे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न झाली.कळवण शहरातील हरिओम लॉन्स येथे शेतकरी संवाद मेळावा, लोकनेते ए.टी. पवार आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन, कळवण नगरपंचायत हद्दीतील विकासकामांचा लोकार्पण सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते व आमदार पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी सांगितले. आमदार नितीन पवार यांनी सांगितले की, कळवण तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तेव्हा शेतक-यांना दिलासा देण्यासाठी आणि पिकांची पाहणी करण्यासाठी खासदार पवार शेतक-यांच्या बांधावर आले होते. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई मिळाली. आता पुन्हा पवार हे १० मार्च रोजी कळवण तालुक्याच्या दौ-यावर येत असून, शेतकरी बांधवांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करून पवार यांनी नियोजनासंदर्भात सूचना केल्या. ज्येष्ठ नेते नारायण हिरे, रवींद्र देवरे, नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, बाजार समिती सभापती धनंजय पवार, मविप्र संचालक अशोक पवार, मजूर संघाचे माजी अध्यक्ष शरद गुंजाळ, हेमंत पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पवार, उपसभापती विजय शिरसाठ, संतोष देशमुख, रविकांत सोनवणे, मनोज शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला सभापती मीनाक्षी चौरे, सुनील देवरे, लाला जाधव, ज्ञानदेव पवार, संदीप वाघ, शरद पगार, विलास रौंदळ, बाळासाहेब रौंदळ, प्रल्हाद गुंजाळ, वसंत रौंदळ, संदीप पगार, उमेश सोनवणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी संवाद मेळाव्याच्या नियोजनाची कळवणला बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 4:57 PM