प्रत्यक्षपणे एकत्र येण्यावरच निर्बंध : बैठका, व्याख्याने अन् उद्घाटनसुध्दा ‘ऑनलाइन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 04:24 PM2020-08-02T16:24:09+5:302020-08-02T16:24:26+5:30
उद्घाटन समारंभ एवढेच नव्हे तर शोकसभांसारखे श्रध्दांजली वाहण्याचे कार्यक्रमसुध्दा या लॉकडाऊनपासून अद्यापपर्यंत ‘ऑनलाइन’ पध्दतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक : कोरोनाचे संक्रमण वाढीस लागले अन् एकत्र जमण्यावर निर्बंध आले आहे. विवाह सोहळ्यांपासून अंत्यसंस्कारापर्यंत लोकांच्या कमाल शासकिय स्तरावरून उपस्थिती निश्चित करून देण्यात आली आहे. अशा स्थितीत कार्यालयीन बैठकांपासून चर्चासत्र, व्याख्याने, एखादा उद्घाटन समारंभ एवढेच नव्हे तर शोकसभांसारखे श्रध्दांजली कार्यक्रमसुध्दा या लॉकडाऊनपासून अद्यापपर्यंत ‘ऑनलाइन’ पध्दतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. एकूणच मानवी जीवनशैली बदलून टाकणारा आणि मानवाला खूप काही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे धडे या कोरोनामुळे मिळाले आहे.
एकत्र येत समारंभ, चर्चासत्र, कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करण्यावरच कोरोनामुळे निर्बंध आले. कोरोनाच्या संक्रमणाला गर्दीमुळे निमंत्रण मिळत असल्याने ‘गर्दी टाळा, कोरोना रोखा’ अशाप्रकारे जनजागृती होत आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कोरोनाच्यामुळे आलेल्या या निर्बंधावर सहज मात करता आली आहे. विविध अॅप्लिकेशनचा वापर करत एकत्र येत ऑनलाइन चर्चा, व्याख्यान, कार्यालयीन दैनंदिन बैठका घेत विचारांची देवाणघेवाण होताना दिसत आहे. एकूणच कोरोनामुळे सार्वजनिक सण, उत्सवांसह सार्वजनिक कार्यक्रमांचे स्वरूपसुध्दा बदलून गेल्याचे चित्र आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा वाढता फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी सामुहिकरित्या होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली गेली. तसेच गर्दीची ठिकाणे, रेल्वेस्थानक, बसस्थानक, प्रार्थनास्थळे अशा सर्वच ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जात आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थाही पुर्ण क्षमतेने अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. तसेच प्रार्थनास्थळे, पर्यटनस्थळांवरही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
दरम्यान, एकत्र न येता विविध विषयांवरील कार्यक्रम ऑनलाइन पध्दतीने लाइव्ह घेतले जात आहेत. काही दिवसांपुर्वीच देशातील पहिले ‘ई-कोर्ट’चे जिल्हा व सत्र न्यायालयात उद्घाटन करण्यात आले. हा संपुर्ण उद्घाटनसोहळे विशेष लिंकद्वारे लाइव्ह करण्यात आला होता. शोकसभादेखील ऑनलाइन पध्दतीने आयोजित करत मान्यवरांकडून शोकसंदेश व्यक्त केले जात आहेत. शहरातील मंगेश मिठाईचे संचालक दिनेश अग्रवाल यांचे दोन दिवसांपुर्वी निधन झाले. त्यांचा श्रध्दांजलीचा कार्यक्रमही ऑनलाइन घेऊन सर्वांसमोर आगळेवेगळे उदाहरण ठेवले.