रंगमंचावरून विश्वबंधुत्वाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:38 AM2018-09-17T00:38:41+5:302018-09-17T00:39:12+5:30
सिद्धार्थचे गृहत्यागाची वास्तविक कारणमीमांसा, सिद्धार्थचा मारक प्रवृत्तीवर विजय अशा प्रसंगामधून युवराज सिद्धार्थच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत रंगमंचावरुन कलावंतांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.
नाशिक : सिद्धार्थचे गृहत्यागाची वास्तविक कारणमीमांसा, सिद्धार्थचा मारक प्रवृत्तीवर विजय अशा प्रसंगामधून युवराज सिद्धार्थच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत रंगमंचावरुन कलावंतांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक पालीभाषा गौरव दिनानिमित्त ‘अत्त दीप भव’ ही पाली-मराठी भाषेतील नाटिका सादर करण्यात आली. माधव सोनवणे लिखित व प्रशांत हिरे दिग्दर्शित या नाटिकेत विविध पात्र रंगविणाऱ्या कलावंतांच्या मुखी पाली भाषा होती तर त्याचा अर्थही मराठीतून सांगितला जात होता. रोहिणी नदीच्या पाण्यावरून त्या काळी शक्य संघ आणि कोलीय यांच्यात वाद होत होते. सिद्धार्थला शक्य संघात घेताना काही अटी लादल्या गेल्या. त्यानंतर त्याचा गृहत्यागाचा निर्णय, सुजाताकडून झालेले खीरदान, सम्यकसंबोधी प्राप्ती, धम्मदीक्षा, दरोडेखोर अंगुलीमालची धम्मदीक्षा असे विविध प्रसंग मांडण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
सचिन चव्हाण (सिद्धार्थ व गौतम बुद्ध), दिलीप काळे (सिद्धोधन), अश्विनी सूर्यवंशी (सुजाता), डॉ. सोनाली गायकवाड (यशोधरा), मृणाल निळे (चांडालिका), भूषण गायकवाड (सिंहमल), शकुंतला दाणी, किरण पाटील, नितीन साळवे, मिलिंद साळवे, सतीश पवार, कोमल ढोले आदिंनी भूमिका साकारल्या. माणिक कानडे यांची रंगभूषा, तर मिलिंद साळवे यांची वेशभूषा होती.