महावितरणच्या अॅपद्वारे ग्राहकांचे मीटर रिडिंग
By admin | Published: February 17, 2017 12:10 AM2017-02-17T00:10:10+5:302017-02-17T00:10:21+5:30
तंत्रज्ञान : ४५ हजार ग्राहकांची अॅपच्या माध्यमातून वीजजोडणी
नाशिक : राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाइन सेवा मिळावी यासाठी महावितरणने तयार केलेल्या अॅपला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, या अॅपच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे.
महावितरणचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांकरिता सध्या हे अॅप उपयुक्त ठरत असल्याचा दावा महावितरणने केला आहे. महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाइल अॅप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून केवळ सात महिन्यांत जवळपास १० लाख ग्राहकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. या अॅपद्वारे आतापर्यंत १ कोटी ७० लाख ग्राहकांचे मीटर रिडिंग घेण्यात आले आहे. तसेच ७ लाख ४३ हजार ग्राहकांनी आपल्या वीज बिलांचा भरणा करण्यासाठी या अॅपचा वापर केला असून सुमारे ४५ हजार ८१३ ग्राहकांना अॅप्सच्या माध्यमातून नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
या अॅपद्वारे नवीन ग्राहकांना वीजजोडणी अर्ज, वीजबिलांची माहिती व बिलांचा भरणा वीजसेवांविषयी तक्रारी व अभिप्राय इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रिडिंग घेण्यात आले नाही त्यांना अॅपद्वारे मीटर रिडिंग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे अॅप महावितरण वेबसाइट, गुगल प्ले, अॅपल, विंडोज स्टोअर्स येथे उपलब्ध आहे.
राज्यातील सुमारे ३८ हजारांपेक्षा अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी कर्मचारी मित्र अॅप डाउनलोड केले असून, याद्वारे नवीन वीजजोडणी, खंडित वीजपुरवठ्याबाबत एसएमएस, अचूक वीजमीटर रिडिंग, फिडर व डीटीसी मीटर रिडिंग आदि दैनंदिन कामे प्रभावीपणे केली जात आहेत. त्यामुळे महावितरणच्या कामकाजात अधिक गती आली आहे. (प्रतिनिधी)