सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस असल्याने म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली. पूर्व भागात मध्यम स्वरूपाचा मात्र संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील ठाणगाव, पांढुर्ली, सोनांबे, कोनांबे, औंढेवाडी, धोंडबार, आडवाडी, शिवडा, बोरखिंड, आगासखिंड, बेलू या डोंगराळ भागात रात्रीपासून सुरू झालेला जोरदार पाऊस रविवारी सायंकाळपर्यंत सुरूच होता. पांगरी, वावी, देवपूर, वडांगळी, नांदूरशिंगोटे, मऱ्हळ, सोमठाणे, पंचाळे, पाथरे, दोडी, सायाळे, दातली, खोपडी, खंबाळे आदिंसह पूर्व भागातील गावांमध्ये रविवारी दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. या परिसरात गेल्या चार-पाच वर्षांत पर्जन्यमान खूपच कमी राहिले आहे. या पावसामुळे बळीराजाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. नायगाव खोऱ्यातही दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)
म्हाळुंगीला पूर
By admin | Published: July 10, 2016 9:51 PM