लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ऑलिम्पिकच्या शर्यतीत धावताना फिनिशिंग पॉइंटपाशी छाती पुढे करुन धावण्याचे तंत्र माझ्या लक्षात आले नव्हते. किंबहुना फोटोफिनीश काय असते, तेच माहिती नसल्यानेच त्या शर्यतीमधील पदकापासून वंचित राहिल्याची खंत मिल्खासिंग यांनी नाशिक भेटीदरम्यान बोलताना व्यक्त केली होती. साईबाबा हॉस्पिटलच्या डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी आयोजित केलेल्या वॉकेथॉनच्या निमित्ताने नाशिकमध्ये आले असताना उपस्थित हजारो नागरिकांशी त्यांनी मनमोकळा संवाददेखील साधला होता.
‘फ्लाइंग सीख’ या नावाने सर्वज्ञात असलेले मिल्खासिंग हे उतारवयातही किती फिट होते, त्याचीच प्रचिती २०१३ सालच्या वॉकेथॉन उपक्रमातील त्यांच्या वावरण्यातून क्रीडाप्रेमी नाशिककरांना अनुभवता आली होती. त्यावेळी त्यांनी काही काळ उघड्या जीपमधून तर काही वेळ धावत आणि चालत उपस्थितांना अभिवादन केले होते. मिल्खासिंग प्रथमच नाशिकला आल्याने त्यांची केवळ एक झलक पाहण्यासाठी हजारो नाशिककरांनी डोंगरे वस्तीगृह मैदानावर गर्दी केली होती. त्यावेळी उपस्थितांसमोर बोलताना भारतात चीनप्रमाणे रिझल्ट देणारे प्रशिक्षक नेमण्याची गरज असल्याचे सांगितले होते. मी आयुष्यातील ८० पैकी ७७ शर्यती जिंकलो. मात्र, ज्या ३ शर्यती जिंकू शकलो नाही, त्याची तसेच भारतात इतक्या वर्षानंतरही ऑलिम्पिकपर्यंत धडक मारु शकणारा दुसरा मिल्खासिंग अजूनही तयार झाला नसल्याची खंतदेखील व्यक्त केली होती. त्यावेळी मिल्खासिंग यांनी डॉ. धर्माधिकारी यांच्याकडून नाशिकमधील उदयोन्मुख धावपटूंची माहिती घेऊन त्यांच्याशीही संवाद साधला होता. तसेच ‘सावरपाडा एक्सप्रेस’ अर्थात कविता राऊतने पटकावलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमधील पदकाबद्दल तिचे अभिनंदन करुन तिला भविष्यासाठी मार्गदर्शनदेखील केले होते.
मिल्खासिंग सरांशी माझी ओळख करुन देण्यात आली, तेव्हा मी कॉमनवेल्थमधील पदकविजेती असल्याचे सांगताच त्यांनी गुड, व्हेरी गुड बेटा ऐसेही जी जान लगाकर कोशीश करना, असे म्हणत शाबासकी दिली होती. तसेच आशियाई आणि ऑलिम्पिकच्या पदकापर्यंत धडक मार अशी प्रेरणादेखील दिली होती. त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी आहेत.
कविता राऊत, ऑलिम्पियन धावपटू
-----------------------
संपूर्ण देशाचा आयकॉन असलेल्या मिल्खासिंग यांनी उदयोन्मुख धावपटूंशी बोलताना स्वत:च्या करिअरचा नव्हे तर देशाचा झेंडा कसा उंचावता येईल, हाच विचार करण्याचा दिलेला सल्ला खरोखरच त्यांच्या महानतेची आठवण करुन देणारा होता. अत्यंत प्रभावशाली,शालीन आणि तंदुरुस्तीच्या बाबतीत आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ते कायम स्मरणात राहतील.
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, हृदयरोग तज्ज्ञ
------
फोटो
१९मिल्खासिंग