बोगस कांदा बियाणांमुळे लाखोंची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 06:34 PM2021-03-06T18:34:14+5:302021-03-06T18:34:45+5:30
कंधाणे : कंधाणेत एका खाजगी कृषि फार्मकडून आणलेल्या कांदा बियाणात शेतक-यांची फसवणूक झाली असुन दोन महीन्याच्या झालेल्या कांदा पिकाला संपूर्ण डोंगळे निघाले असुन कांदा पिकाचा रंग ही एक सारखा नसल्याने येथील शेतक-यांना लाखो रूपयाचा आर्थिक फटका बसला आहे. संबंधित बियाणे मालकाला याबाबत सुचना देवुनही त्याने याकडे दुर्लक्ष केले असुन नुकसानग्रस्त शेतक-यांना दाद नसल्याने या शेतकऱ्यांनी अखेर पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
कंधाणे : कंधाणेत एका खाजगी कृषि फार्मकडून आणलेल्या कांदा बियाणात शेतक-यांची फसवणूक झाली असुन दोन महीन्याच्या झालेल्या कांदा पिकाला संपूर्ण डोंगळे निघाले असुन कांदा पिकाचा रंग ही एक सारखा नसल्याने येथील शेतक-यांना लाखो रूपयाचा आर्थिक फटका बसला आहे. संबंधित बियाणे मालकाला याबाबत सुचना देवुनही त्याने याकडे दुर्लक्ष केले असुन नुकसानग्रस्त शेतक-यांना दाद नसल्याने या शेतकऱ्यांनी अखेर पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
चालु हंगामात अवकाळी पावसाने या भागातील लागवडीसाठी तयार केलेली कांदा बियाणे वाया गेली होती. बियाणे वाया गेल्याने कांदा उत्पादक कंपनीने आपल्या कंपनीच्या वाणाची कृत्रिम टंचाई निर्माण करत चढ्या भावाने कांदा बियाणांची विक्री केली होती. पावसाने शेतात टाकलेली बियाणे वाया गेल्याने बळीराजांनी हातउचल व कर्जाऊ रक्कमा काढत कांदा बियाणे खरेदी केले व त्याची लागवड केली आहे. कंधाणे येथील दहा ते पंधरा शेतकरी वर्गाने कंधाणे येथे विक्रीसाठी आलेल्या धुळे येथील एका कृषि फार्मने बियाणांची लाखो रूपयांची खरेदी केली. कांदा बियाणे शेतात टाकून नंतर रोप तयार केल्यानंतर डिसेंबर माहिन्यात कांदा लागवड केली. कांदा लागवडीपर्यंत चांगली दिसणारी बियाणे आजमितीस कांदा पिकास संपूर्ण डोंगळे आले असुन पिकाचा रंग ही वेगवेगळा असल्याने शेतकऱ्यांना लाखोंचा आर्थिक फटका बसला आहे.
बोगस कांदा बियाणांमुळे कांदा उत्पादनात घट निर्माण झाली असुन संपुर्ण रब्बी हंगाम वाया गेला असल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित कांदा बियाणे उत्पादकांने महागड्या दराने कांदा बियाणे विक्री करत कोणतेही अधिकृत बील संबधित शेतक-यांना दिले नाही. बील नंतर देतो अशी थाप देत लाखो रूपयांच्या बोगस बियाणांची विक्री कंधाणेत केली असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधितांला प्रत्यक्षात शेताच्या बांधावर बोलवत पिक पाहणी करण्याची विनंती केली असता विक्रेत्यांने उडवाउडवीची उत्तरे देत शेतक-यांनाच धमकावले आहे.
फसवणूक झालेल्या शेतक-यांनी दोषींवर कडक कारवाई व्हावी व आपल्याला न्याय मिळावा म्हणुन आपल्या मागणीचे निवेदन नाशिक पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना दिले आहे.
संबंधित विक्रेत्याकडून मी ५५०० रूपये किलो प्रमाणे २५ किलो बियाणे खरेदी केले असुन, साधारणपणे सहा ते सात एकरात या धुळे येथील कृषी फार्मकडील कांदा पिकाची लागवड केली आहे. आजमितीस संपुर्ण कांदापिकाला डोंगळे निघाले असुन कांदा पिकाला रंग ही एकसारखा नसल्याने माझे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
- रवि बिरारी, शेतकरी.
कंधाणेतील शेतकरी वर्गाची कांदा बियाण्यात फसवणूक झाली असल्याची तक्रार प्राप्त झाली असुन संबधित लागवड केलेल्या क्षेत्राला भेट देवून प्रत्यक्ष पाहणी करून कांदा बियाणे बोगस असल्यास संबधित विक्रेते व उत्पादक कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल यापुढे शेतकरी वर्गाने नोंदणीकृत व परवाना धारक विक्रेत्याकडून खते व बियाणे खरेदी करून आपली फसवणूक टाळावी.
- सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, बागलाण.
(०६ कांदा १)