किमान तापमान ९.१अंश : राज्यातील नीचांकी नोंद पुन्हा नाशकातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 03:41 PM2021-02-09T15:41:55+5:302021-02-09T15:45:34+5:30
पुढील काही दिवस नागरिकांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. शहरात दिवसा तसेच रात्रीही आकाश पूर्णत: निरभ्र राहत असल्याने पारा वेगाने घसरत असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
नाशिक : शहरासह जिल्ह्यात थंडीचा कहर सुरुच असून मंगळवारी (दि.९) पारा पुन्हा एक अंशाने खाली घसरला. थंडीच्या वाढत्या कडाक्याने नाशिककर गारठून गेले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्रसह विदर्भही गारठण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी नाशकात ९.१अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. मागील चार दिवसांपासून नाशिक शहराचे वातावरण कमालीचे थंड झाल्याने ह्यवाईन कॅपिटलह्ण सध्या राज्यातील ह्यकुल सिटीह्ण बनले आहे. सलग तीसऱ्या दिवशी नाशिक हे राज्यात सर्वाधिक थंड शहर ठरले.
शहराचे किमान तापमान रविवारी १० अंशांपर्यंत घसरले होते. यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली. मंगळवारीसुध्दा पारा घसरल्यामुळे थंडीत अधिकच वाढ झाल्याच अनुभव नाशिककरांना येत आहे. पहाटे थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे दिसून आले. पहाटेपासून सुर्योदयापर्यंत शहराने धुक्याची दुलई पांघरलेली होती. त्यामुळे सकाळी नाशिककरांना जणु आपण महाबळेश्वर, कुलुमनाली किंवा माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणी तर नाही ना? असा प्रश्न पडला होता. सकाळी नाशिककरांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविल्याचेही दिसून आले. गोदाकाठासह विविध झोपडपट्टयांमध्ये शेकोट्यांपासून उब घेत थंडीच्या कडाक्यापासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला. दिवसभर थंड वारे वाहत राहिल्यामुळे वातावरणात गारवा टिकून होता. दिवसभर वातावरणात गारवा राहत असल्यामुळे नाशिककर सकाळपासून रात्रीपर्यंत ऊबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहे.शनिवारी संध्याकाळपासून नागरिकांना थंडीचा कडाका अनुभवयास येत आहे.
पुढील काही दिवस नागरिकांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. शहरात दिवसा तसेच रात्रीही आकाश पूर्णत: निरभ्र राहत असल्याने पारा वेगाने घसरत असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
महाबळेश्वर १२.४ तर नाशिक ९.१
राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणुन ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मंगळवारी १२.४ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले तर नाशिकमध्ये त्यापेक्षाही कमी ९.१ अंश तापमानाची नोंद झाली. सलग मागील आठवडाभरापासून महाबळेश्वरच्या तुलनेत नाशकातील हवामान अधिक थंड राहत असल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.