पोलिसानेच केले अल्पवयीन मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:18 AM2021-09-14T04:18:44+5:302021-09-14T04:18:44+5:30
पंचवटी : पेठवरील मेहेरधाम परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याला ...
पंचवटी : पेठवरील मेहेरधाम परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी दुपारी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित पोलिसाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पोलीस मुख्यालय मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या दीपक जठार नामक पोलीस कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
संशयित पोलीस कर्मचारी जठार व सदर अपहृत मुलगी हे दोघे एकमेकांचे परिचित असून कालपासून दोघेही बेपत्ता झाले होते त्यानंतर मुलीच्या वडिलांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मानवी तांत्रिक विश्लेषण साहाय्याने संशयिताचा शोध घेतला पोलिसांनी संशयिताने गुन्हा करताना वापरलेली कारदेखील जप्त केली आहे. दरम्यान, जठर याची पत्नीदेखील पोलीस खात्यात असून मुंबई येथे कार्यरत असल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोलीस पुत्राने पोलिसांवर हल्ला चढवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना उघडकीस आली होती. सदर घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच पोलीस कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडल्याने खाकी आणि विशेषत: म्हसरूळ पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.