नाशिक कृऊबात अतिक्रमीत गाळे बांधून मनपाची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:15 AM2021-03-28T04:15:03+5:302021-03-28T04:15:03+5:30
नाशिक- पंचवटीतील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने शासनाच्या पणन विभागाकडून बांधकाम नकाशाला परवानगी न घेताच खु्ल्या जागेत गाळे बांधकाम ...
नाशिक- पंचवटीतील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने शासनाच्या पणन विभागाकडून बांधकाम नकाशाला परवानगी न घेताच खु्ल्या जागेत गाळे बांधकाम करण्यासाठी महापालिकेला प्रस्ताव सादर केला आहे. यापूर्वी देखील गाळ्यांचे अशाच प्रकारे बांधकाम करण्यात आले असून बेकायदेशीर बांधकाम हटवण्याचे आदेश न्यायालयाने देऊन देखील महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला आहे.
यासंदर्भात चुंभळे यांनी थेट महापालिका आयुक्तांकडेच तक्रार केली आहे. एपीएमसी ॲक्टनुसार बाजार समितीला कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे असेल तर शासनाच्या पणन संचालनालयाकडून बांधकाम नकाशा मंजुर करून घेऊन नंतर त्यास महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. मात्र, बाजार समितीच्या तत्कालीन सभापतींनी सर्व नियमांचा भंग करून यापूर्वी वेळोवेळी महापालिकेकडून प्लॅन मंजूर करून घेतले आहेत. तसेच कच्चे व पक्के बांधकाम करून मनपाचा कर देखील बुडवला आहे, अशी तक्रार केला आहे. यापूर्वीही पेठरेाडवरील सर्वे नंबर ७४,७५,७६, २९,३० व ४५ या नाशिक व मखमलाबादच्या हद्दीतील जमीन शासनाने बाजार समितीला हस्तांतरीत केली. त्यात ३०/३/७ व ३०/३/२ या गटातील क्षेत्र या संपादनात समाविष्ट केलेले नाही. ही जमिन बाजार समितीला हस्तांतरीत केलेेले नसताना देखील २७७१०० चौ. मि. इतक्या क्षेत्राऐवजी आर्किटेक्टकडून ३०६०९३१० चौमीत एकुण चार लेआऊट तयार करून ते महापालिकेकडे सादर करून मंजुर करून घेतले आहे. म्हणजेच महापालिकेची दिशाभूल करून फसवणूक देखील करून घेतली आहे. स्वत:च्या नसलेल्या जागेवर पाण्याची टाकी आणि विद्युत स्टेशनचे बांधकाम केले आहे, असे चुंभळे यांनी तक्रारीत म्हंटले आहे.पेठरोडवरील मार्केटमधील अन्न धान्य विभाग तसेच वाढीव गाळे अशा एकुण २२१ गाळ्यांवर अस्तित्वात नसलेला एफएसआय बाजार समितीने विकल्याची लेखा परीक्षणात नोंद असल्याचेही चुंभळे यांनी तक्रार अर्जात नमूद केले अहो. बाजार समितीतच्या आवारात बांधलेले दीडशे तात्पुरते गाळे आणि अन्य बांधकाम हटवण्याचे प्रकरण न्यायालयात गेले आणि हे बांधकाम हटवण्याचे आदेश देखील देण्यात आले. मात्र महापालिका जाणिवपूर्वक कारवाई करीत नसल्याचे चुंभळे यांनी नमूद केले आहे.