पावसाचा अंदाज चुकल्याने खरिपाचे वेळापत्रक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:48+5:302021-07-23T04:10:48+5:30
सटाणा (नितीन बोरसे) : सर्वत्र पावसाने थैमान घातले असताना बागलाण तालुका मात्र आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे. ...
सटाणा (नितीन बोरसे) : सर्वत्र पावसाने थैमान घातले असताना बागलाण तालुका मात्र आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे. वरुणराजाने हवामान खात्याचे अंदाज अक्षरशः चुकीचे ठरविल्याने यंदा बागलाणच्या बळीराजाचे खरीप हंगामाचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
दोन दिवसांच्या रिपरिपमुळे तब्बल दीड महिन्यांपासून खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला असला तरी हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पांच्या जल साठ्यात वाढ होताना दिसत आहे. मात्र, बहुतांश लघु प्रकल्प अद्याप कोरडेठाक असल्याने यंदा पावसाअभावी दुष्काळाचे संकट अधिकच गहिरे होत चालले आहे.
यंदा मार्च महिन्यातच विविध वेध शाळांनी चांगला पावसाळा असल्याबरोबरच वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याचे भाकीत केले होते. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे बळीराजा पावसाळ्यापूर्वीच सुखावला आणि त्याने बँका कर्ज देत नसताना सावकारांकडून पैसे जमा करून खरिपाचे नियोजन केले. वेळेत मान्सून दाखल होणार म्हणून बी-बियाणे, खते खरेदी केली. मात्र, दीड महिना उलटूनही पाऊस नसल्यामुळे बागलाण तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्याचा पश्चिम भाग वगळता पावसाअभावी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तालुक्याचा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा मोसम, आरम, करंजाडी, कान्हेरी, हत्ती हा परिसर सलग तीन ते चार वर्षांपासून कमी पावसामुळे उजाड होण्याच्या मार्गावर आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या रिपरिपमुळे खोळंबलेल्या पेरण्यांना गती आली खर; परंतु दमदार पाऊस नसल्यामुळे विहिरींनी अक्षरशः तळ गाठले आहेत. येत्या पंधरा-वीस दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास आधीच दीड पावणेदोन महिन्याने उशिरा पेरा झालेली पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.
-----------------------------
भात व नागलीची अल्प लागवड, सूर्यफूल, तिळाचा शून्य पेरा
बागलाण तालुक्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात काही भागांत झालेल्या पावसामुळे ८ जुलैअखेरपर्यंत फक्त तीस टक्के क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या एकूण ६७ हजार ८६० हेक्टर क्षेत्रापैकी ५३ हजार ४५४ हेक्टर वर म्हणजे ७८.७७ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, यंदा कमी आणि उशिरा झाल्यामुळे पश्चिम पट्ट्यातील प्रमुख पीक भात व नागली लागवड ठप्प झाली आहे. भाताच्या सरासरी २०३१.६० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ४५५ हेक्टर क्षेत्रावर भाताची तर नागली १५५५.६० हेक्टरपैकी केवळ २५५ हेक्टरवर लागवड झाली आहे. तर तीळ, सूर्यफुलाच्या सव्वा तीनशे हेक्टर क्षेत्रावर यंदा शून्य टक्के पेरा झाला असून या क्षेत्राची जागा आता सोयाबीन पिकाने घेतली आहे. सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत असून तब्बल १५७२.३० हेक्टरवर पेरा झाला आहे. ज्वारीचा देखील शून्य पेरा झाला आहे.
------------
पीक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र
भात 2031.60 455
बाजरी 19851 11530.70
मका 34859 36692
नागली 1555.60 255
ज्वारी 6.40 79.80
तूर 809 513.80
मूग 4076 700.70
उडीद 567 326.60
भुईमूग 2176 1065.10
सूर्यफूल 11 00
तीळ 5 00
खुरासणी 198 23.50
सोयाबीन 1194 1572.30
कापूस 78 103
-----------------
पाण्याचे संकट अधिकच गहिरे .......
बागलाण तालुक्यात आजअखेर ४८.३० मिलीमीटर इतका सरासरी पाऊस झाला आहे. पश्चिम पट्ट्यात रिपरिप सुरू असल्यामुळे हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे या लघु प्रकल्पांनी पाणीसाठ्याच्या टक्केवारीत संथगतीने वाढ होताना दिसत आहे. मात्र, उत्तर, पूर्व बागलाणमध्ये अद्यापही दमदार पाऊस नसल्यामुळे या भागाची तहान भागविणारे दोधेश्वर, जाखोड, शेमळी, तळवाडे, रातीर, चिराई, चौगाव, बिलपुरी, बोढरी, भीमाशंकर हे लघु प्रकल्प अद्याप कोरडेच असल्याने भीषण पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. गिरणेला पूर पाणी गेल्यामुळे सटाणा शहराचा पाणी प्रश्न काहीअंशी सुटला असला तरी मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी आणि करंजाडी या नद्यांना अद्याप पाणी न गेल्यामुळे या नद्यांवरील पाणी योजना एन पावसाळ्यात कोलमडल्याचे भयावह चित्र बघायला मिळत आहे.