महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात अटीतटीची लढाई सुरु आहे. यावेळी चुरशीच्या होत असलेल्या लढतीत उतरलेल्या ५२ पैकी ५१ उमेदवारांची माहिती उघड झाली आहे. या उमेदवारांमध्ये नाशिकचे अपक्ष उमेदवार प्रतापराव सोनावणे सर्वात श्रीमंत आहेत. त्यांच्या मागोमाग कोकण पदवीधर मतदारसंघातील निरंजन डावखरे हे दुसऱ्या नंबरवर आहेत. सरासरी काढली तर प्रत्येक उमेदवाराकडे किमान साडेचार कोटीची मालमत्ता असल्याचे दिसते. अर्थात नाशिकच्या प्रतापरावांमुळे ही सरासरी जास्त दिसत असावी. कारण या कोट्यधीशांच्या गर्दीत अॅड. अरुण नाथुजी आंबेडकर हेही आहेत, ज्यांनी फक्त सात हजारांची मालमत्ता असल्याचा दावा केला आहे.
विधानपरिषद निवडणुका म्हटले की तो पैशांचा खेळच असे आपल्याकडे मानले जाते. या निवडणुकीलाही अपवाद मानता येणार नाही, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या अहवालातून स्पष्ट होते आहे, एडीआरला प्रतिज्ञापत्र मिळालेल्या ५१ उमेदवारांपैकी २३ उमेदवार हे कोट्यधीश आहेत. त्यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत नाशिक विप मतदारसंघातून रिंगणात उतरलेले प्रतापराव नारायणराव सोनावणे यांची आहे. त्यांच्याकडे ११ कोटी ६५ लाखांची चल तर ४६ कोटी ४५ लाखांची अचल मालमत्ता असे मिळून सर्वाधिक ५८ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्यामागोमाग नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले निरंजन डावखरे आहेत. त्यांची ३५ कोटींची मालमत्ता आहे. वडिलांचा राजकीय वारसा उजव्या वाटेवरुन पुढे नेत असलेले निरंजन डावखरे यांनी स्वत:चे उत्पन्न ४०लाखांचे असल्याचे म्हटले आहे. स्वत:चे उत्पन्न जास्त असणाऱ्यांच्या यादीत भाजपचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अमित मेहता हे पहिल्या नंबरवर असून त्यांनी ६० लाखाच्या उत्पन्नाचा दावा केला आहे, नंबर एकचे कोट्यधीश उमेदवार सोनावणे यांनी मात्र येथे तिसऱ्या क्रमांकाचे ३९ लाख ५६ हजाराचे उत्पन्न दाखवले आहे.
कोट्यधीश उमेदवारांची टॉप टेन यादी पुढील प्रमाणे आहे:
१) प्रतापराव सोनावणे- अपक्ष नाशिक ५८ कोटी
२) निरंजन डावखरे- भाजपा कोकण ३५ कोटी
३) किशोर दराडे- अपक्ष नाशिक ३१ कोटी
४) चंदन शर्मा- अपक्ष मुंबई १९ कोटी
५) नजिब मुल्ला राष्ट्रवादी- कोकण १५ कोटी
६) अनिकेत पाटील- भाजपा नाशिक १३ कोटी
७) कपिल पाटील -लोकभारती मुंबई ८.२८ कोटी
८) विलास पोतनीस- शिवसेना मुंबई ८.०४ कोटी
९) संदिप बेडसे- अपक्ष नाशिक ७ कोटी
१०) बाळासाहेब म्हात्रे- अपक्ष मुंबई ५ कोटी